पावसाने पुन्हा लेंडी नाला परिसरातील शिवाराला फटका
बेळगाव : गेल्या दोन दिवसांपासून झालेल्या दमदार पावसामुळे पुन्हा लेंडी नाला परिसरातील शिवाराला पूर आला आहे. त्या पुरामुळे भातपीक पाण्याखाली गेले आहे. राष्ट्रीय महामार्गावर असलेले काँक्रिटचे बॉक्स ब्लॉक झाल्यानेच ही समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे तातडीने ते बॉक्स खुले करावेत, अशी मागणी होत आहे. या पावसामुळे आता शेतकऱ्यांनी नव्याने लावणी केलेले भातपीक पाण्याखाली गेले आहे. त्यामुळे पुन्हा फटका बसला आहे. लेंडी नाल्याचे पाणी बळ्ळारी नाल्याला जाऊन मिळते. राष्ट्रीय महामार्गावर बळ्ळारी नाल्याचे पाणी जाण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने बॉक्स तयार केले आहेत. ते बॉक्स पूर्णपणे मातीने आणि कचऱ्याने बुजून गेले आहेत. त्यामुळे पूर्वेकडच्या बाजूला पाण्याचा निचरा होणे अवघड झाले आहे. परिणामी दरवर्षीच या परिसरातील शिवाराला फटका बसत आहे. तेव्हा तातडीने पाण्याचा निचरा करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि महानगरपालिकेने पाऊल उचलावे, अशी मागणी करण्यात आली आहे. या पावसामुळे पोसवणी झालेले तसेच सध्या पोसवणी सुरू असलेले भातपीक खराब होण्याची भीती व्यक्त होत आहे.