पावसाने गाठली 75 इंचाची नोंद
यलो अलर्ट जारी
विशेष प्रतिनिधी/ पणजी
यंदाच्या मोसमात आतापर्यंत 45 इंच पावसाची नोंद झाली असून मे महिन्याच्या तेरा दिवसांमध्ये 30 इंच विक्रमी पाऊस पडल्याने आतापर्यंत गोव्यात 75 इंच पावसाची विक्रमी नोंद झाली आहे. अद्याप पावसाचे पावणे तीन महिने शिल्लक असून यावर्षी पाऊस कहर करण्याची शक्यता आहे.
काही वर्षांपूर्वी गोव्यात 125 इंच नोंद होत असे, परंतु आता पावसाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. गेल्या वर्षी 160 इंच पावसाची नोंद झाली होती. यावर्षी 180 इंचापर्यंत पाऊस पोहोचण्याची शक्यता आहे. यंदा प्रथमच धारबांदोडा हे नवीन केंद्र स्थापन झाले आहे आणि तिथे आतापर्यंत सर्वाधिक पाऊस पडत आहे.
गेल्या 24 तासात पावसाचे प्रमाण थोडे कमी झाले. हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जारी केला होता, आजपासून पावसाचे प्रमाण मर्यादित राहील, असा अंदाज आहे. कारण पुढील पाच दिवसांसाठी हवामान खात्याने यलो अलर्ट जारी केला आहे. गेल्या 24 तासांत सरासरी दीड इंच पावसाची नोंद झाली त्यामुळे यंदाच्या मोसमात एक जूनपासून आतापर्यंत 45 इंच पाऊस पडला. वार्षिक सरासरीपेक्षा तो सुमारे तीन टक्के जादा पडला आहे. धारबांदोडा येथे सुमारे चार इंच पाऊस पडला. फोंडा तीन इंच, सांगे दोन इंच, केपे दोन इंच, सांखळी दोन इंच, दाबोळी, मडगाव, जुने गोवे येथे प्रत्येकी दीड इंच, म्हापसा, पेडणे, काणकोण, येथे प्रत्येकी एक इंच तर मुरगाव व पणजी येथे प्रत्येकी पाऊण इंच पावसाची नोंद झाली. आजपासून 11 जुलैपर्यंत यलो अलर्ट जारी करण्यात आला असून यादरम्यान काही भागात मध्यम तथा मोठ्या प्रमाणात पावसाची शक्यता आहे.