राज्यात पावसाची 174 इंचांपर्यंत झेप
मोसमाचे राहिलेत चार दिवस : येत्या रविवारी, सोमवारी मसुळधार
पणजी : मंगळवारी रेड अलर्टच्या काळात 7.5 इंचापेक्षाही जादा आणि सर्वाधिक पावसाची नोंद पेडणे येथे झाली होती. गेल्या 24 तासांमध्ये गोव्यात सरासरी पावणेचार इंच पावसाची नोंद झाली आहे. हवामान खात्याने आज व उद्या ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाचे संकेत देऊन येलो अलर्ट जारी केला आहे. मात्र रविवार किंवा सोमवारी गोव्याला मुसळधार पाऊस पुन्हा झोडपण्याची शक्यता आहे. मंगळवारच्या अतिरिक्त पावणेचार इंचामुळे यंदाच्या मोसमात गोव्यात पडलेला एकूण पाऊस 174 इंच झाला आहे. मंगळवारी पणजीत 5.5 इंच, तर मुरगावात 4 इंच पावसाची नोंद झाली. परतीचा पाऊस मंगळवारी फार आक्रमक होता. हवामान खात्याने मान्सून आक्रमक झालेला आहे, अशी माहिती दिली. यंदाच्या मोसमात सरासरी 47 टक्के जादा पावसाची नोंद झाली आहे.
मोसमाचे राहिलेत चार दिवस
यंदाचा मोसम संपुष्टात येण्यास आता केवळ 4 दिवस शिल्लक राहिलेले आहेत. पुढील दोन तीन दिवसांमध्ये गोव्यात मुसळधार पाऊस पडू शकतो. यंदाच्या मोसमात सरासरी साधारणत: 180 इंच पाऊस होण्याची शक्यता आहे. मंगळवारी सकाळी जोरदार पावसाला प्रारंभ झाला आणि त्याची व्याप्ती बहुतांश किनारी भाग व त्यापासून 15 ते 20 कि.मीच्या आत होती. त्यामुळे सत्तरी, डिचोली, सांखळी या भागात त्यातुलनेत मर्यादित पाऊस पडला. पावसाने दुपारी विश्रांती घेतली व रात्री उशिरा पुन्हा सुरु झाला. पहाटेपर्यंत हलक्या स्वरुपाच्या पावसाची रिपरिप चालू होती. काल बुधवारी मर्यादित स्वरुपात पाऊस पडून गेला. हवामान खात्याने नारंगी अलर्ट जारी केले होते. मात्र पुर्वेकडून मोठ्या प्रमाणात पावसाचे ढग शीघ्रगतीने पश्चिमेच्या दिशेने सरकत असल्याने पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस पडू शकतो. हवामान खात्याने मात्र तशी कोणतीही सूचना दिलेली नाही. केवळ गुरुवार व शुक्रवारसाठी येलो अलर्ट जारी केले आहे.