For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

राज्यात पावसाचा जोर अद्याप 31 टक्के तूट

06:53 AM Aug 30, 2026 IST | Tarun Bharat Portal
राज्यात पावसाचा जोर  अद्याप 31 टक्के तूट
Advertisement

पणजी/  विशेष प्रतिनिधी

Advertisement

चार दिवसाच्या विश्रांतीनंतर शनिवारी गोव्यात पावसाने जोर धरला. संपूर्ण गोव्यात दिवसभरात जोरदार पाऊस झाला. पणजीमध्ये सकाळी साडेआठ ते सायंकाळी साडेपाच या दरम्यान एक इंच पावसाची नोंद झाली. यंदाच्या मोसमामध्ये अद्याप 31 टक्के पाऊस तुटीचा ठरला आहे.

शनिवारी गोव्यात पावसाने बराच जोर धरला. सर्वत्र जोरदार पावसाची सलामी झाली. चार दिवसांत पावसाचे प्रमाण अत्यल्प झाले होते, मात्र शनिवारी सकाळपासूनच सर्वत्र जोरदार पाऊस सुरू होता. तसेच दिवसभर काळ्याकुट्ट ढगांनी आकाशात आक्रमण केले होते. त्यामुळे अंधारसदृश स्थिती निर्माण झाली होती.  तसेच हवेमध्ये बराच गारवा दिसून आला. पुढील पाच दिवसांमध्ये राज्यात अधूनमधून तुरळक पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.

Advertisement

आंध्रप्रदेश किनारपट्टीच्या दरम्यान कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला होता त्याचा परिणाम म्हणून गोव्यातही जोरदार वाऱ्यासह शनिवारी जोरदार पाऊस पडला आणि त्यामुळे गेल्या चार दिवसातील पावसाने भरून काढली. गोव्यातील सर्व धरणे भरली असून सध्या पाण्याची चिंता मिटलेली आहे. मात्र पावसाचा अद्याप एक महिना शिल्लक असून यादरम्यान मध्यम स्वरूपाच्या पावसाची आवश्यकता आहे. शनिवारी गोव्यात सर्वत्र जोरदार पाऊस सुरू झाल्यानंतर हवामान खात्याने दुपारी यालो अलर्ट जारी केला मात्र हा अलर्ट शनिवारपुरताच मर्यादित होता. सायंकाळी उशिरा पावसाने थोडी उसंत घेतली.

गोव्यात यंदा पावसाचे प्रमाण थोडे कमी असले तरीदेखील पीक पाण्यासाठी हा योग्य पाऊस आहे, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. दरवर्षापेक्षा यंदा ऑगस्ट महिन्यात त्या तुलनेत पाऊस कमी पडलेला आहे. सप्टेंबरमध्ये पाऊस किती आक्रमक होतो हे पहावे लागेल. गेल्या 24 तासांमध्ये गोव्यात पाच पूर्णांक सहा मिलिमीटर एवढी नाममात्र पावसाची नोंद झाली. यामुळे यंदाच्या मोसमात पडलेला पाऊस आता 73 इंच एवढा झाला आहे. वार्षिक सरासरीच्या तुलनेत तो 31 टक्के कमी आहे. दिनांक 4 सप्टेंबरपर्यंत राज्यात मध्यम तथा हलक्या स्वरूपात पाऊस पडेल, असा हवामान खात्याने अंदाज वर्तवला आहे. धारबांदोडा येथे गेल्या 24 तासांमध्ये एक इंच, तर सांगे आणि पेडणे या ठिकाणी एक सेंटीमीटर एवढी पावसाची नोंद झाली. इतर सर्व केंद्रामध्ये अर्धा सेंटीमीटरपेक्षाही कमी पाऊस पडला आहे.

Advertisement
Tags :

.