कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

जिल्ह्यात यावर्षी सरासरीच्या अर्ध्यावरच पाऊस!

11:45 AM Aug 04, 2025 IST | Radhika Patil
Advertisement

चिपळूण :

Advertisement

दरवर्षी जून आणि जुलै महिन्यात धो-धो कोसळून जिल्ह्यात सरासरीच्या जवळ जाणारा पाऊस यावर्षी मात्र सरासरीच्या अर्ध्यावरच थांबलेला दिसून येत आहे. किंबहुना गतवर्षी जुलैअखेरपर्यंत 75 टक्के पाऊस कोसळलेला असतानाच यावर्षी मात्र तब्बल 8 तालुक्यांना 50 टक्के गाठतानाही दमछाक उडालेली दिसून येत आहे. गतवर्षी 3 ऑगस्टपर्यत 78.75 टक्के पावसाची नोंद जिल्ह्यात झाली असताना यावर्षी मात्र ती अवघी 51 टक्केच आहे. यावर्षी सर्वाधिक लांजा तालुक्यात तर दापोलीत कमी पावसाची नोंद झाल्याचे महावेधच्या पर्जन्यमान अहवालावरून स्पष्ट झाले आहे.

Advertisement

दरवर्षी पेरणीनंतर जून महिन्यात पावसाची प्रतीक्षा करावी लागते. मात्र यावर्षी पेरणीपूर्वीच म्हणजेच मे महिन्यातच पाऊस सुरू झाल्याने शेतकरी हवालदिल झाला होता. शेतं भरून गेल्याने पेरणी करायची कशी, पेरणी केलीच तर रोप उगवणार कधी? अशा अनेक सवालांबरोबरच कोकणात ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीपर्यंत विषय गेला होता. मात्र मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पाऊस काहीसा थांबल्यानंतर पेरण्याही झाल्या आणि रोपंही उगवली. त्यापुढील शेतकऱ्यांच्या दृष्टीने पुढील प्रश्न आपोआप मिटले. नंतर जूनच्या दुसऱ्या आठवड्यात पावसाने सुरूवात केली. मात्र त्यामध्ये तितकासा जोर नव्हता. मात्र पुढील तिसऱ्या आठवड्यात चार-पाच दिवस मुसळधार पाऊस, तोही अगदी शंभर ते दिडशे मि.मी.पर्यंत कोसळल्याने जून महिन्याची नेहमीची सरासरी गाठणे सहजशक्य झाले.

जिल्ह्याची वार्षिक सरासरी ही 3 हजार 364 मि. मी. इतकी असली तरी साधारणपणे जिल्ह्यात सरासरी साडेतीन ते चार हजार मि. मी. पाऊस कोसळतो. यावर्षी महावेधच्या दैनंदिन पर्जन्यमान अहवालावर नजर टाकली तर यावर्षी 3 ऑगस्टपर्यंत जिल्ह्यात 1716 मि.मी. इतक्या तर गतवर्षी 2649.33 मि. पावसाची नोंद झाली होती. यावर्षी सर्वाधिक 1927.50 मि. मी. इतका पाऊस लांजात तर 1369.20 मि. मी. इतका कमी पाऊस दापोलीमध्ये झाल्याची नोंद आहे. तर महारेनच्या पर्जन्यनोंद अहवालानुसार गतवर्षी 3 ऑगस्टपर्यंत जिल्ह्यात 91.59 मि. मी. तर यावर्षी 62.95 मि. मी. इतका पाऊस झाल्याची नोंद केली गेली आहे. 3 ऑगस्टपर्यंत जिल्ह्यात मंडणगडमध्ये 1767.40 मि. मी., दापोली 1369.20, खेड 1882.70, गुहागर 1636.40, चिपळूण 1777, संगमेश्वर 1904.50, रत्नागिरी 1392, लांजा 1927.50 तर राजापूर येथे 1790.90 मि. पावसाची नोंद झाली आहे.

सद्यस्थितीत भातशेतीची कामे सर्वत्र पूर्णत्वास गेली असून सध्या अधूनमधून कोसळणाऱ्या सरी या शेतीसाठी योग्य आहेत. आतापर्यंत पावसाच्या दृष्टीने जून आणि जुलै महिने हे अधिक परिणामकारक ठरले आहेत. ऑगस्ट आणि सप्टेंबर हे महिने बेभरवशाचे आणि जर-तरच्या गणितावर अवलंबून असतात. तरीही पुढील 2 महिन्यात पाऊस कोसळून नेहमीची सरासरीही गाठू शकेल, यावर शेतकरी आशावादी आहेत. मात्र पुढे धो-धो कोसळला तर मात्र शेतीसाठी आणि सुरू झालेल्या कडधान्यांच्या पेरणीसाठी शेतकऱ्यांच्या दृष्टीने काहीसा धोकादायक ठरू शकणारा आहे.

यावर्षी सरासरीपेक्षा पाऊस कमी असला तरी सद्यस्थितीत त्याचा शेतीवर कुठलाही परिणाम होणारा नाही. मात्र आठ-दहा दिवसांचा पावसाचा खंड पडला तर मात्र शेतीवर परिणाम होणार आहे. भातशेतीवर करपा रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता चिपळूण तालुका कृषी अधिकारी शत्रुघ्न म्हेत्रे यांनी व्यक्त केली.

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article