महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

पावसाचे थैमान

03:03 PM Aug 02, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पुरामुळे हाहाकार, अनेक लोकांना सुरक्षितस्थळी हलवले : जनजीवन विस्कळीत,24 तासांत 5.5 इंच पाऊस

Advertisement

पणजी : गोव्याच्या सीमा भागात महाराष्ट्र आणि कर्नाटकात पडलेल्या तुफान वृष्टीमुळे शापोरा, साळ, डिचोली, नानोडा, सांखळी, केरी, वाळपई, सोनाळ, केपे, माशे इत्यादी भागात महाप्रलयाने थैमान घातले. गोव्यातही बुधवारी रात्री सुरू झालेला मुसळधार पाऊस गुऊवारी सकाळपर्यंत जोरदारपणे कोसळत होता. परिणामी पहाटे 5.30 वा.च्या दरम्यान वरील सर्व भागात पुराचे पाणी पसरले. अनेक घरांघरांमध्ये पाणी घुसले. अनेक गाड्या पाण्यात बुडाल्या. डिचोली शहरच सकाळी पाण्याखाली गेले तर सांखळीच्या वाळवंटीने रौद्रऊप धारण केले. तिथेही अनेक घरांमध्ये पाणी शिरले. वाळपईसह सत्तरीच्या अनेक भागात पुरामुळे जनतेचे प्रचंड हाल झाले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. हवामान खात्याने बुधवारी रात्री उशिरा गोव्यात रेड अलर्ट जारी केला. गुऊवारी पावसाचा जोर मंदावला तरीही आभाळ दाटून आले होते. आज व उद्या मुसळधार पावसाचा इशारा देत ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. गेल्या 24 तासांत केपेमध्ये 8 इंच तर राज्यात सरासरी 5.5 इंच पावसाची नोंद झाली.

Advertisement

केरळच्या धर्तीवर गोव्यात व गोव्याच्या सीमा भागात बुधवारी रात्री उशिरा मुसळधार पावसाने अक्षरश: थैमान घातले. गोव्यातही सर्वत्र मुसळधार पाऊस पडत राहिल्याने अगोदरच दुथडी भरून वाहणाऱ्या नद्यांना पहाटेच्या दरम्यान महापुराचे स्वऊप प्राप्त झाले. डिचोलीच्या नदीला एवढा मोठा महापूर आला की संपूर्ण शहरात सर्वत्र 1 मीटरपेक्षा जास्त प्रमाणात पुराचे पाणी पसरले होते. सांखळीच्या वाळवंटी नदीने आक्रमक तथा रौद्रऊप धारण केल्याने या नदीवर उभारण्यात आलेल्या नव्या पुलाला पाणी टेकले. सांखळी बाजाराच्या बाजूने उभारलेल्या संरक्षक भिंतीमुळे व बसविण्यात आलेल्या मोठ्या पंपघरामुळे शहरात पुराचे पाणी मोठ्या प्रमाणात शिरले नाही, मात्र विठ्ठलापूर भागात पुराचे पाणी घुसले. अनेकांना पहाटेच्या दरम्यान, घरातून सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. 2022 नंतर प्रथमच एवढा मोठा महापूर सांखळीत आला. सायंकाळी पुराचे पाणी ओसरले.

सांखळीतील अनेक घरांमध्ये शिरले पाणी

सांखळीच्या वाळवंटी नदीला आलेल्या पुरामुळे बंदिरवाडा, विठ्ठलापूर भागाला जबरदस्त तडाखा बसला. यात बंदिरवाडा, काजीवाडा भागातील सुमारे दहा घरांमध्ये पाणी शिरले. तेथील 25 जणांना विठ्ठलापूर येथील श्री विठ्ठल रखुमाई सरकारी प्राथमिक शाळेत हलविण्यात आले. तसेच सांखळी बाजारातील दोन घरांना पाण्याने वेढले होते. तर नगरपालिकेचा तळमजला जलमय झाला होता.

डिचोली शहरात सर्वत्र पाणीच पाणी

डिचोली नदीची पातळी प्रचंड प्रमाणात वाढली होती. त्यामुळे नदीचा संपूर्ण परिसर जलमय होऊन पूरसदृशस्थिती निर्माण झाली. श्री देव कोटेश्वर मंदिरासमोरील दीनदयाळ भवनापर्यंतचा रस्ता पूर्णपणे पाण्याखाली गेला. या भागातील अनेक दुकाने, हॉटेल, पेट्रोल पंप, घरांमध्ये पाणी शिऊन नुकसान झाले. पाणी वाढतच गेल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज मैदानाजवळील रस्ता, न्यायालयासमोरील रस्ता पाण्याखाली गेला होता.

सत्तरीतील अनेक गावांना महापुराचा वेढा

सत्तरी तालुक्यातील केरी भागातील घोटेलीचा पूल पाण्याखाली गेल्याने अनेकजण तिथे अडकून पडले. केरी गावाला पुराने वेढा घातला तर सोनाळ गावांमध्ये म्हादईने आक्राळविक्राळ ऊप धारण केल्याने अनेकांच्या घरात पाणी शिरले. बऱ्याच जणांना सुरक्षितपणे घरातून बाहेर काढले. गुडी पारोडा केपे येथेही कुशावतीने रौद्ररुप धारण केल्याने अनेक गावांमध्ये पुराचे पाणी शिरले तसेच कित्येक रस्ते पाण्याखाली गेल्याने वाहतूक बंद ठेवणे भाग पडले. हवामान खात्याने  दिवसभरासाठी रेड अलर्ट जारी केला होता. परंतु, त्या दरम्यान अत्यल्प पाऊस झाला. गुऊवारी सायंकाळी उशिरा पावसाने पुन्हा जोर धरला. दरम्यान, या रात्रभर कोसळलेल्या पावसामुळे अनेक झाडे जमिनदोस्त झाली. अग्निशामक दलाला वारंवार फोन कॉल्स येते होते. पुरामध्ये अडकून पडलेल्यांना बाहेर काढण्यासाठी प्रशासनाने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत यंत्रणा राबविली. त्यामुळे सुदैवाने कोणतीही जीवितहानी टळली. यंदा पावसाने कहर केला असून बुधवारी रात्रभर कोसळलेल्या पावसामुळे डिचोली तालुक्यातील नानोडा येथे नदीला आलेल्या महापुरात कदंबसह अनेक वाहने अडकून पडली.

मुलांना त्वरित घरी पाठवा, शिक्षण खात्याचा आदेश

हवामान खात्याने बुधवारी मध्यरात्रीच्या दरम्यान गोव्यात मुसळधार पाऊस सुऊ असताना रेड अलर्ट जारी केला व तत्पूर्वी अनेक भागात पुराचे पाणी शिरत होते. सर्वत्र पूरस्थिती निर्माण झाल्यानंतर शिक्षण संचालकांनी एक आदेश जारी करून शाळा बंद ठेवा व ज्या मुलांच्या परीक्षा आहेत त्या मागाहून घ्या असे कळविले. तसेच शाळांनी पालकांशी संपर्क साधून आपापल्या मुलांना घरी घेऊन जाण्यासही सांगितले व शाळा सोडण्यात आल्या.

24 तासांत 5.5 इंच, वाळपईने दीड शतक ओलांडले  

राज्यात सर्वत्र मुसळधार पाऊस पडणे चालूच आहे. गेल्या 24 तासांत पडलेल्या 5.5 इंच पावसामुळे यंदाच्या मौसमात पडलेला सरासरी पाऊस आता 123.50 इंच एवढा झाला आहे. वाळपईत गेल्या 24 तासांमध्ये 7 इंच पाऊस पडल्याने तेथील पावसाने इंचाचे दीड शतक पार केले. वाळपईत 153 इंच पाऊस पडला तर गोव्याची चेरापुंजी ठरत असलेल्या अंजुणे धरण क्षेत्रात गेल्या 48 तासांमध्ये 15 इंच पावसाची नव्याने नोंद झाली. त्यामुळे यंदाच्या मौसमात त्या परिसरात पडलेला पाऊस आता 169 इंच एवढा झाला आहे.

गेल्या 24 तासांतील पाऊस व एकूण पाऊस (इंचामध्ये)

  1. म्हापसा 4.5 116
  2. पेडणे 4.5 125
  3. फोंडा 5.50 128.50
  4. पणजी 4.75 117.50
  5. जुनेगोवे 4.75 120
  6. सांखळी 5.00 138
  7. वाळपई 7.00 153.50
  8. काणकोण 3.5 117
  9. दाबोळी 4.5 95
  10. मडगाव 5.5 117.50
  11. मुरगाव 5.5 108
  12. केपे 8.00 130.50
  13. सांगे 6.5 146.00

गोव्यातील पावसाने यंदा अनेक वर्षांचा विक्रम तोडला. गोव्यात सध्या सरासरी 117 इंच पाऊस पडलेला आहे व पावसाचा जोर पुढील 48 तास तसाच राहाणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. आमच्या ठिकठिकाणच्या वार्ताहर,प्रतिनिधीने दिलेल्या माहितीनुसार मुसळधार पाऊस व पुराने हाहाकार माजविल्याने जनजीवन विस्कळीत झाले. ग्रामीण भागात नागरिक एकमेकांच्या मदतीला धावत असल्याचे चित्र दिसून आले.

अंजुणे धरणाचा नवा इतिहास,169 इंच पाऊस, 92.40 मीटर पाणीसाठा

दरम्यान, अंजुणे धरण क्षेत्रात बुधवारी 7 इंच तर गुऊवारी सकाळपर्यंत 8 इंच एवढी विक्रमी पावसाची नोंद झाली. अंजुणे धरणातून यंदा धरणाच्या इतिहासात प्रथमच 16 जुलैपासून जे धरणाचे चार दरवाजे खुले केले ते आतापर्यंत बंदच केले नाहीत. एवढा सातत्याने पाऊस कोसळत आहे. आतापर्यंत तिथे 169 इंच पाऊस पडलेला आहे. धरणात सध्या 92.40 मीटर एवढा पाणीसाठा आहे. गुऊवारी मुसळधार पावसामध्ये धरणाचे चारही दरवाजे 15 सें.मी.नेच खुले ठेवले होते. दर सेकंदाला 28 घनमीटर पाण्याचा विसर्ग केला जातो. म्हणजेच दिवसभरात 4.5 दशलक्ष घनमीटर पाणी धरणातून सोडले जात आहे. या धरण प्रकल्पात 44.83 दशलक्ष घनमीटर पाणी साठविले जाते.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article