For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पावसाचा दणका

06:50 AM May 21, 2025 IST | Tarun Bharat Portal
पावसाचा दणका
Advertisement

नैऋ त्य मोसमी वाऱ्याने यंदा चांगलाच वेग पकडल्याचे दिसत आहे. अंदमान निकोबार बेटावर वेळेआधीच दाखल झालेला मान्सून आता केरळच्या उंबरठ्यावर असून, पुढच्या तीन ते चार दिवसांत मोसमी पाऊस देवभूमीत दाखल होण्याची शक्यता आहे. हे बघता या वर्षी पावसाचा प्रवास सुपरफास्ट होण्याची चिन्हे दिसतात. फेब्रुवारी ते मे हे चार महिने उन्हाळ्याचे म्हणून ओळखले जातात. मे महिन्यामध्ये अवखळ वळवाचा पाऊस होतो. अर्ध्या, एक तासात धूमधडाका करतो आणि निघूनही जातो. पूर्वापार हे चालत आले आहे. तथापि, यंदा वळवाचा पाऊस, पूर्वमोसमी पाऊस आणि मोसमी पाऊस हे एकमेकांना अगदी जोडून येत असल्याचे पहायला मिळते. खरेतर मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून महाराष्ट्रासह देशाच्या अनेक भागांत पाऊस होत आहे. तथापि, मागच्या आठवडाभरात या पावसाने अक्षरश: कहर केला आहे. काही भागात तर ढगफुटीसदृश पाऊस झाल्याची उदाहरणे आहेत. विशेषत: मंगळवारचा पाऊस भयंकरच ठरावा. पुणे व पिंपरी-चिंचवड ही महाराष्ट्रातील प्रमुख शहरे म्हणून प्रसिद्ध आहेत. तथापि, जोरदार पावसाने या शहरांच्या नियोजनाचा जो बोजवारा उडाला, तो विचार करण्यासारखा म्हणता येईल. पुणे शहरात रस्ते जलमय, गटारे तुंबणे यांसारखे प्रकार नवीन नाहीत. परंतु, पावसाच्या पुरात वाहने वा महत्त्वाचे सामान वाहून जाण्याची वेळ येत असेल, तर त्यातून शहराचा प्रवास कोणत्या दिशेने सुरू आहे, हेच कळते. खरे तर पालिका प्रशासनाकडून पावसाळापूर्व कामे ही पावसाळ्याच्या आधी म्हणजे मार्च, एप्रिलपर्यंत होणे अपेक्षित आहे. परंतु, पुणे मनपाचा कारभार सध्या उफराट्या दिशेने सुरू असल्याचे दिसते. ऐन पावसाळ्यात सुरू असलेली ड्रेनेजची कामे हे त्याचेच उदाहरण. स्मार्ट सिटी म्हणून मिरवणाऱ्या पिंपरी-चिंचवडचीही वेगळी अवस्था नाही. हिंजवडी हे आयटी केंद्र या शहरामध्ये मोडते. मात्र, रस्त्यांची चाळण आणि वाहतुकीची कोंडी हा येथील नित्यनेम बनला आहे. त्यात पावसाने तडाखा द्यावा आणि आयटी सीटीची ऐट क्षणात मातीमोल व्हावी, असाच सारा प्रकार. मागच्या काळात येथील वाहतूक कोंडीला वैतागून अनेक कंपन्यांनी येथून काढता पाय घ्यायला सुऊवात केली आहे. हा प्रश्न सोडविण्याऐवजी त्यात वाढच होत असेल, तर हिंजवडीवरचा फोकस कमी होण्याची भीती संभवते. हे पाहता हिंजवडीतील रस्ते, ख•s, कोंडी व पाण्याचा निचरा यांसह एकूणच या भागाच्या सोयीसुविधांकडे लक्ष पुरवावे लागेल. जी तऱ्हा पॉश भागाची, त्यापेक्षा अधिक दयनीय अवस्था ही शहरातील दाट लोकवस्तीची होय. चिखली, तळवडे व इतर नवीन गावे हा या शहरातील दाट लोकवस्तीचा भाग. परवाच्या 93 मिमी पावसाने येथील नियोजन व्यवस्थेचा पार बोजवारा उडाल्याचे पहायला मिळाले. काही घरांमध्ये पाणी शिरले, तर काही भागांत रस्त्यांना अक्षरश: नद्यांचे स्वऊप प्राप्त झाल्याचे दिसले. रस्त्याची उंची वाढल्याने खाली गेलेली घरे हा वाढत्या शहरांमधील मोठा प्रश्न बनला आहे. कोणताही सारासार विचार न करता प्रशासनाकडून रस्त्याची उंची वाढवली जाते. पण, त्याचा फटका बसतो, तो सर्वसामान्य नागरिकांना. तरीही पालिका प्रशासन त्यातून बोध घेताना दिसत नाही. आता तर अनेक स्थानिक स्वराज्य संस्था अंतर्गत रस्तेही सिमेंट काँक्रिटचे करण्यावर भर देताना दिसतात. आधीच आजूबाजूच्या भागाचे सिमेंटीकरण झाल्याने सध्या मोकळ्या जागा दुर्मीळ झाल्या आहेत. अशात पाणी न झिरपणारे काँक्रिटचे रस्ते पुराची व्याप्ती वाढवण्यासच कारणीभूत ठरतात. पण, लक्षात घेतो कोण, असा सगळा मामला आहे. पुणे व पिंपरा-चिंचवड ही फक्त प्रातिनिधीक उदाहरणे. राज्यातील अन्य शहरांतही मागच्या काही दिवसांत कमी अधिक प्रमाणात अशीच स्थिती पहायला मिळणे, यातून शहरांच्या एकूण ढासळत्या व्यवस्थेवरच झगझगीत प्रकाश पडतो. कर्नाटकची राजधानी आणि आयटी सिटी म्हणून लौकिक मिळवणाऱ्या बेंगळूरमध्येही हेच पहायला मिळत असेल, तर याला काय म्हणायचे? मागच्या दोन ते चार दिवसांत बेंगळूरमध्ये मुसळधार पाऊस होत आहे. त्यामुळे शहराचा बराचसा भाग जलमय झाला असून, अनेक रस्ते पाण्याखाली गेल्याचे दृश्य पहायला मिळाले. रस्त्यांच्या नद्या, त्यातून वाहून जाणाऱ्या गाड्या, हे तर या शहराचे नेहमीचे रूप. एका राज्याच्या राजधानीत व औद्योगिकदृष्ट्या देशातील महत्त्वाचे शहर असलेल्या शहराची अशी अवस्था होणे, हे सर्वार्थाने मारक होय. पुणे, बेंगळूरसारख्या शहरांची हीच स्थिती होत असेल, तर उद्या तिथे नवीन कंपन्या येतील का, आयटी कर्मचाऱ्यांना हे शहर आपलेसे वाटेल का, असा प्रश्न निर्माण होतो. हे बघता आत्तापासून उपाययोजना करणे क्रमप्राप्त ठरते. नेमेची येतो पावसाळा, असे म्हणतात. यंदा तो लवकर आला, इतकेच. मान्सूनचा वेगवान प्रवास बघता 1 जून वा त्याआधीच तो महाराष्ट्रात सक्रिय होण्याची चिन्हे दिसत आहेत. तसे पावसाचे आगमन हे शेतकऱ्यांसह सर्वांसाठीच सुखावह. पण, यंदा कोणतीही तयारी नसताना अवचितपणे वऊणराजाची एन्ट्री झाल्याने अनेकांच्या छातीत धडकी बसली नसेल, तर ते आश्चर्यच. यंदा अवकाळी पावसाने महाराष्ट्रासह देशाच्या अनेक भागांतील शेतीचे मोठे नुकसान केले. महाराष्ट्रातील पावसाचा जवळपास 23 ते 25 जिल्ह्यांतील हजारो हेक्टरवरील शेतीला फटका बसल्याची आकडेवारी सांगण्यात येते. वास्तविक पाऊस हे निसर्गाने दिलेले वरदान होय. भारतासारख्या देशाकरिता मोसमी पाऊस पोषणाचेच काम करतो. परंतु, काळ, वेळ सोडून पावसाने तडाखा दिला, तर ते आपत्तीस कारण ठरते. सध्याची अवस्था फारशी वेगळी दिसत नाही. त्यातच यंदा देशात सरासरीपेक्षा अधिक म्हणजे 105 टक्के पावसाची शक्यता आहे. त्यामुळे काही भागात पूरसदृश स्थिती निर्माण होण्याची शक्यता गृहीत धरावी लागेल. हे बघता आत्तापासून सर्वच दृष्टीने आपल्याला तयार रहावे लागेल.  पावसाळ्याला सामोरे जाण्यासाठी प्रशासनानेही तयारी करायला हवी.

Advertisement

Advertisement
Tags :

.