आसाममध्ये पावसाचा कहर, अनेक ठार
वृत्तसंस्था
नवी दिल्ली
यंदा मान्सूनच्या पावसाने आसाममध्ये कहर केला आहे. अतिवृष्टीमुळे नद्यांना प्रचंड पूर आले असून आतापर्यंत 100 च्या आसपास लोकांना जीव गमवावा लागला आहे. अतिवृष्टीमुळे शेकडो खेडी जलमय झाली असून त्यांचा इतर भूभागांशी संपर्क तुटला आहे. आसामधील मुख्य नदी ब्रम्हपुत्राच्या पात्राबाहेर पाणी आल्याने नदीतटावरील काही खेडी वाहून गेली आहेत. आतापर्यंत 7 लाख लोकांवर या वृष्टीचा परिणाम झाला असून अनेकांनी सुरक्षित आसरा घेतला आहे.
यंदा राज्याच्या पूर्व भागात अभूतपूर्व पूरस्थिती निर्माण झाली आहे. आता पावसाचा जोर काही प्रमाणात ओसरला असला, तरी पूरस्थिती कायम आहे. मंगळवारपासून नद्यांच्या पाण्याची पातळी कमी होऊ लागली आहे. त्यामुळे येत्या तीन-चार दिवसांमध्ये स्थिती पूर्वपदाला येईल अशी शक्यता आहे. अतिवृष्टीचा फटका सात जिल्ह्यांना बसला असून, शिवसागर जिल्हा सर्वाधिक प्रभावित असून त्याखालोखाल चराईदेव आणि जोरहाट जिल्ह्यांना फटका बसला आहे. या तीन जिल्ह्यांमधील 800 हून अधिक खेडी जलमय झाली असून साधारणपणे साडेचार लाख लोक बेघर झाल्याचे वृत्त आहे. याच तीन जिल्ह्यांमध्ये साधारणत: 40 जणांचा पावसामुळे मृत्यू झाला आहे. हे तिन्ही जिल्हे नागालँडला लागून आहेत. त्या राज्यात काही दिवसांपूर्वी ढगफुटी झाली होती. या ढगफुटीमुळे आसाममधील नद्या दुथडी भरुन वाहू लागल्या, असे या जिल्ह्यांच्या प्रशासनांचे म्हणणे आहे.
180 साहाय्य केंद्रे
आसाम सरकाच्या आपत्तीनिवारण विभागाने वेगाने काम करुन पूरग्रस्तांसाठी 180 साहाय्यता आणि निवास केंद्रांची स्थापना केली आहे. या केंद्रांमध्ये जवळपास सहा लाख लोकांनी आश्रय घेतला आहे. त्यांना तेथे अन्नपाणी आणि औषधांची सोय करुन देण्यात आली आहे. येत्या दोन-तीन दिवसांमध्ये हे लोक आपापल्या घरी जाण्याच्या स्थितीत येतील, अशी प्रशासनाची अपेक्षा आहे. पुरामुळे शेतभूमीची मोठी हानी झाली असून पिके वाहून गेली आहेत, अशीही माहिती देण्यात आली.