For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

येळ्ळूर परिसरात वादळी वाऱ्यासह पाऊस

11:30 AM Apr 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
येळ्ळूर परिसरात वादळी वाऱ्यासह पाऊस
Advertisement

पालेभाज्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान

Advertisement

वार्ताहर /येळ्ळूर

येळ्ळूर परिसरात गुरुवारी वादळी वाऱ्यासह पावसाचे आगमन झाले. वादळी वाऱ्यामुळे पुन्हा परिसरातील शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी झाडे कोसळली. तसेच पालेभाज्यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्यामुळे विद्युतपुरवठा खंडित झाला होता. आठ दिवसांपूर्वी येळ्ळूर परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस होऊन अनेक घरांचे नुकसान झाले होते. त्यानंतर पावसाने विश्रांती घेतली होती. गुरुवारी पुन्हा दुपारी जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाचे आगमन झाले. त्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. येळ्ळूरबरोबरच धामणे आणि शहापूर शिवारामध्येही जोरदार पाऊस झाला. धामणे शिवारातील एका शेतकऱ्याच्या कारली पिकाचे मोठे नुकसान झाले आहे.

Advertisement

शहरात पावसाची हुलकावणी : उष्म्यात पुन्हा वाढ, दमदार पावसाची प्रतीक्षा

उष्म्यामध्ये भयानक वाढ झाली आहे. गुरुवारी तर अंगातून घामाच्या धारा वाहत होत्या. त्यामुळे पाऊस पडेल, अशी अपेक्षा साऱ्यांची होती. मात्र पावसाने गुरुवारी हुलकावणी दिली आहे. तालुक्याच्या दक्षिण भागातील काही गावांमध्ये वादळीवाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. मात्र शहरामध्ये पाऊस झाला नसल्याने पुन्हा उष्म्यात वाढ झाली आहे. यामुळे साऱ्यांचाच जीव कासावीस झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून उष्म्याने उच्चांक गाठला आहे. अंगातून घामाच्या धारा वाहून साऱ्यांचीच घालमेल होत आहे. मागील आठवड्यातही शुक्रवारी पाऊस झाला होता. त्यामुळे थोडासा दिलासा मिळाला होता. मात्र त्यानंतर पुन्हा पावसाने दडी मारली आहे. याचबरोबर उन्हाच्या झळा तीव्र झाल्या आहेत. त्यामुळे उन्हामध्ये जाणेदेखील अवघड झाले आहे. एसी, फॅनचा आधार घ्यावा लागत आहे. मात्र बऱ्याचवेळा वीजपुरवठा खंडित होत असल्यामुळे त्याचाही त्रास सहन करावा लागत आहे. पाणी समस्या तर गंभीरच बनत चालली आहे. वळिवाचे दमदार पाऊस झाले तरच ही समस्या दूर होणार आहे. मात्र केवळ आतापर्यंत एकच जोरदार वळीव पाऊस झाला आहे. या व्यतिरिक्त पावसाचा शिडकावा होऊन दडी मारली आहे. परिणामी उष्म्यामध्ये आणखी वाढ होऊ लागली आहे. शुक्रवारी पावसाने पुन्हा हुलकावणी दिल्याने आता साऱ्यांच्याच नजरा आकाशाकडे लागल्या आहेत.

Advertisement
Tags :

.