पाक-न्यूझीलंड सामन्यावर पावसाचे पाणी
वृत्तसंस्था/ कोलंबो
आयसीसीच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील सुपर-8 फेरीला शनिवारी येथे प्रारंभ झाला. दरम्यान सुपर-8 फेरीतील गट 2 मधील न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यात सामना खेळविला जाणार होता. पण मुसळधार पावसामुळे एकही चेंडू न टाकताना पंचांना हा सामना रद्द करावा लागला. या निर्णयामुळे पाक आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांना प्रत्येकी 1 गुण मिळाला.
या सामन्याकडे शौकिनांचे लक्ष अधिक होते. त्यामुळे प्रेक्षकांची गर्दी स्टेडियममध्ये झाली पण पावसामुळे शौकिन निराश झाले. या सामन्यात पाकने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. नाणेफेक करण्यापूर्वी आकाश स्वच्छ, निरभ्र होते. पण त्यानंतर अचानकपणे जोरदार पावसाच्या सरी सुरु झाल्या आणि सातत्याने त्या कोसळल्याने मैदानावर बऱ्याच ठिकाणी पाणी साचले. पंचांनी मैदान आणि खेळपट्टीची पाहणी केली. आणि हा सामना रद्द झाल्याचे घोषित केले. या सामन्यासाठी पाकने आपल्या संघात एक बदल केला. ख्वॉजा नाफयच्या जागी फक्र जमानला अंतिम 11 खेळाडूत संधी देण्यात आली होती. तर न्यूझीलंड संघात तीन बदल करण्यात आले होते. कर्णधार सँटेनरचे या सामन्यात पुनरागमन झाले होते. पोटदुखीमुळे तो कॅनडा विरुद्धच्या सामन्यात खेळू शकला नाही. तसेच लॉकी फर्ग्युसन आणि इश सोधी यांना संघात स्थान मिळाले.
आता न्यूझीलंडचा सुपर-8 फेरीतील पुढील सामना लंकेबरोबर 25 फेब्रुवारीला कोलंबोत तर पाकचा सामना इंग्लंड बरोबर 24 फेब्रुवारीला कोलंबोत होणार आहे. शनिवारचा सामना पावसामुळे वाया गेल्यामुळे गट दोनमधून न्यूझीलंड आणि पाक या दोन्ही संघांनाही आता उपांत्य फेरीसाठी अधिक कसरत करावी लागेल.