‘मुरासु’च्या प्रभावामुळे पावसाचा इशारा
हवामान विभागाकडून 12 राज्यांना अलर्ट जारी : किनारपट्टी भागात सतर्कता
वृत्तसंस्था/ अमरावती, नवी दिल्ली
देशातून मान्सून पूर्णपणे परतला आहे, परंतु नैसर्गिक आपत्ती लोकांचे लक्ष वेधून घेत आहे. मध्यरात्री आंध्रप्रदेश किनारपट्टीला धडकणाऱ्या ‘मुरासु’ चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने पुन्हा एकदा वेगवेगळ्या राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा जारी केला. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मंगळवार, 3 नोव्हेंबर रोजी उत्तर प्रदेश, बिहार, दिल्ली आणि पश्चिम बंगालसह 20 राज्यांसाठी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या काळात ताशी 90 ते 95 किलोमीटर वेगाने जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे.
‘मुरासु’ या वादळाचा ओडिशा, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल आणि बिहारवर गंभीर परिणाम होईल. मुसळधार पावसामुळे तापमान 5 ते 6 अंशांनी कमी होईल. पूर्व भारतीय राज्यांसाठी धुक्याचा इशाराही देण्यात आला आहे. प्रवास करण्यापूर्वी सावधगिरी बाळगा, असा संदेश जारी करतानाच डोंगराळ राज्यांमध्ये भूस्खलनाचा इशाराही देण्यात आला आहे. तसेच पर्यटक आणि मच्छिमारांना किनाऱ्यापासून दूर राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. या वादळामुळे आंध्र प्रदेशातील नेल्लोर येथील मायापाडू बीचवर उंच लाटा आणि सोसाट्याचा वारा किनाऱ्यावर आदळत आहे. विजयवाडा विमानतळावरील दहा विमानांची उ•ाणे रद्द करण्यात आली आहेत. तसेच काही रेल्वेसेवाही रोखण्यात आल्या आहेत. राज्यात एनडीआरएफची तीन पथके तैनात करण्यात आली आहेत.
अर्णब चक्रीवादळानंतर बंगालच्या उपसागरातून उगम पावलेले ‘मुरासु’ चक्रीवादळ वेगाने आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीकडे सरकत आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, हे चक्रीवादळ सोमवारी मध्यरात्री 11.30 ते मंगळवारी पहाटे 4 वाजेपर्यंत ओंगोलेजवळ किनारपट्टीवर धडकणार आहे. या काळात वाऱ्याचा वेग ताशी 100 ते 110 किलोमीटरपर्यंत पोहोचू शकतो. सोमवारी पहाटे 5:30 वाजता, हे चक्रीवादळ चेन्नईपासून 200 किलोमीटर आणि नेल्लोरपासून 210 किलोमीटर अंतरावर होते. ते ताशी 25 किलोमीटर वेगाने पुढे सरकत होते.
तामिळनाडूतील चेन्नई, चेंगलपट्टू आणि तिरुवल्लूर येथे रविवार रात्रीपासून पाऊस पडत आहे. चेन्नईमधील अनेक रस्ते पाण्याखाली गेले आहेत. शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. ओडिशा सरकारने गंजम, गजपती, रायगडा, कोरापुट आणि मलकानगिरी जिह्यांमध्ये स्थलांतरणाच्या प्रयत्नांना गती दिली आहे. या चक्रीवादळाचा परिणाम मध्य प्रदेश, छत्तीसगड, केरळ, तेलंगणा, कर्नाटक आणि महाराष्ट्र या राज्यांवरही होऊ शकतो. येत्या काही दिवसांत या राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. पश्चिम-मध्य बंगालच्या उपसागराजवळ कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यामुळे पूर्वेकडील राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. चारपेक्षा जास्त राज्यांसाठी मोठ्या गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे.
आंध्रात एनडीआरएफ तुकड्या तैनात
चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी तामिळनाडूच्या राणीपेट जिह्यातील अरक्कोनमजवळील नागरिकुप्पम येथून एनडीआरएफच्या चौथ्या बटालियनच्या तीन तुकड्या पाठवण्यात आल्या आहेत. आंध्र प्रदेशातील नेल्लोर, प्रकाशम आणि मार्कापुरम येथे मदत व बचावकार्यासाठी प्रत्येकी 90 जवानांची ही पथके तैनात करण्यात आली आहेत. चक्रीवादळाचा सर्वाधिक परिणाम बापटला, कृष्णा आणि प्रकाशम जिह्यांमध्ये होण्याची शक्यता आहे.
तामिळनाडूत तुफान पर्जन्यवृष्टी
गेल्या 24 तासांत चेन्नईमध्ये माधवरम येथे सर्वाधिक 11 सेंमी पावसाची नोंद झाली. एनोर बंदर आणि नुंगमबक्कम येथे प्रत्येकी 10 सेंमी पावसाची नोंद झाली. शहरातील 22 भुयारी मार्गांपैकी दोन भुयारी मार्गांमध्ये पाणी शिरले आहे. पाणी साचण्याची परिस्थिती हाताळण्यासाठी चेन्नई महानगरपालिकेने पंप आणि क्षेत्रीय पथके तैनात केली आहेत. तिरुवल्लूरमधील पझवेरकाडू येथे समुद्रात 6 फुटांपर्यंतच्या लाटा उसळत आहेत.
ओडिशातही बचाव पथके सतर्क
ओडिशाच्या पुरी जिह्यात चक्रीवादळाचा प्रभाव जाणवू लागला आहे. सोमवार सकाळपासून मुसळधार पाऊस पडत असून समुद्रात उंच लाटा उसळत आहेत. रायगडा जिह्यातील प्रशासनाने सर्व 11 अग्निशमन केंद्रांमधील पथकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. एनडीआरएफ, ओडीआरएएफ आणि ओडिशा अग्निशमन सेवेची 300 हून अधिक बचाव पथके तैनात करण्यात आली आहेत. हवामान खात्याने गंजम आणि गजपतीमध्ये मुसळधार पाऊस, विजांचा कडकडाट आणि ताशी 40-50 किमी वेगाने वारे वाहण्याचा अंदाज वर्तवला आहे.
