MH Rain Update: पुढील 3-4 तासांत कोकण, घाटमाथ्यावर मुसळधार, IMD चा इशारा
या जिल्ह्यांत तीव्र वादळी वारे आणि पाऊस पडण्याची शक्यता
Maharashtra Latest Rain Update : दोन दिवसांपासून पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूरसह ठिकठिकाणी जोरदार पाऊस सुरु आहे. घाट विभागासह कोकण, मध्य महाराष्ट्राला अवकाळी पावसाने अक्षरश: झोडपून काढले आहे. सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी मोठी झाडे उन्मळून पडली आहेत. त्यामुळे वाहतूक ठप्प झाल्याचे बातम्या समोर येत आहेत.
मुसळधार पावसामुळे काल कोकणातील लांजा तालुक्यातील रेल्वे रुळावर दगड पडल्याची घटना घडली आहे. याशिवाय पुण्यात पावसामुळे रस्त्यावर पाणी साचले असल्याने वाहतुकीचा खोळंबा उडला आहे. आजही सकाळपासून घाट माथ्यावर पावसाची रिपरिप सुरुच आहे. पुणे-सातारा हायवेवर पाणीच पाणीच पाणी झाले आहे.
दरम्यान, आता हवामान खात्याने आणखी एक बातमी दिली आहे. आज दुपारी 4 वाजल्यापासून पुढील तीन ते चार तासांत गोवा, सिंधुदुर्ग, सांगली, सातारा, कोल्हापूर, लातूर, विदर्भातील काही भागात मध्यम ते तीव्र वादळी वारे आणि पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.
गोव्यात सध्या पावसाचे थैमान सुरु असून हवामान खात्याकडून किनारपट्टी परिसरासह ठिकठिकणी हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुढील दोन दिवस गोव्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा परिसरात पाऊस जोरदार हजेरी लावणार असून जोरदार वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळ या विभागातील नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
राज्यात भारतीय वायव्य मान्सूनच्या आगमनासह पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. किनारी भागांपासून ते घाट माथ्यापर्यंत मुसळधार ते अतिमुळधार पावसाची शक्यता आहे. दरम्यान, पुणे, मुंबई, रायगड परिसरात वातावरण अंशतः ढगाळ असणार आहे. तरीही या जिल्ह्यातील तुरळक ठिकाणी मध्यम ते हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
कमी दाबाचे क्षेत्र तयार होणार
कर्नाटक, उत्तर कर्नाटक, गोवा किनारपट्टीवर येत्या 12 तासांत कमी दाबाचा क्षेत्र तयार होत आहे. पुढील 36 तासांत क्षेत्र अधिक तीव्र होऊन उत्तरेकडे सरकण्याची शक्यता आहे. याचा परिणाम म्हणून महाराष्ट्राच्या कोकण, किनारपट्टीसह मध्य महाराष्ट्र आणि घाट माथ्यावर मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता आहे.
तसेच 30 ते 40 किमी प्रतिवेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. या परिसरातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे किनारपट्टी परिसरातील मच्छीमारांना मासेमारीसाठी न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे.