Rain Update: पुढील महिन्यातही परतीचा पाऊस बरसणार, हवामान खात्याचा अंदाज
पुढील महिनाभर परतीचा पाऊस बरसणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज
कोल्हापूर : सप्टेंबर महिना निम्मा संपत आला तरी अद्यापही काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी दमदार पाऊस पडत आहे. राज्यातील काही भागात मान्सूनचा मुक्काम वाढला असल्यामुळे परतीच्या पावसालाही उशिरा सुरूवात झाली आहे. त्यामुळे पुढील महिनाभर परतीचा पाऊस बरसणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.
यंदा मे महिन्याच्या मध्यंतरापासूनच पावसाला सुरूवात झाली. त्यानंतर लगेचच राज्यात मान्सून दाखल झाला. जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबरचा निम्मा महिना सपंला तरी पावसाचे वातावरण कायम आहे. तसेच 10 ऑक्टोबरपर्यंत मान्सूनचा मुक्काम राहणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात असल्याने ऑक्टोबर महिन्यातही परतीचा पाऊस हजेरी लावणार आहे.
त्यामुळे ऑक्टोबर हिटचा चटकाही कमी जाणवणार असल्याचा अंदाजही तज्ञांनी व्यक्त केला आहे. यंदा ऋतुमानाचे निम्मे वर्ष पावसाचेच राहीले आहे. राज्यात काही भागात परतीचा पाऊस सुरु झाला आहे. नैऋ=त्य मौसमी व्रायांमुळे परतीच्या पावसाला सुरुवात झाली आहे.
रविवारी मान्सूनने पश्चिम राजस्थानमधून माघार घेतली असल्याचे हवामान विभागाने जाहीर केले आहे. त्यानंतर आता महाराष्ट्रात परतीच्या पावसाला सुरुवात झाली आहे. यंदा तीन दिवस आधीच परतीचा पाऊस सुरु झाला आहे. वायव्य भारतात पावसाची सलग पाच दिवस उघडीप होती. परंतु राज्यात सर्वत्र पाऊस सुरु आहे.
शहरात मंगळवारी सकाळपासूनच ढागाळ वातावरण होते. सकाळचे 11 वाजले तरीही सूर्याचे दर्शन झालेच नाही. हवेत गारठाही जाणवत होता. सायंकाळी काही ठिकाणी पावसाचा शिडकावा झाला. तर काही ठिकणी मध्यम व तुरळक पाऊस झाला.
"ऋतुमानातील बदलामुळे जास्त काळ पाऊस महाराष्ट्रात मान्सून 10 ऑक्टोबरपर्यंत राहणार अशी वातावरणाची स्थिती आहे. त्यामुळे पुढचा एक महिना परतीचा पाऊस होणार आहे. यंदा मे ते सप्टेंबर महिना पावसाळी स्थिती राहिली. पुढील महिन्यातही पावसाचा अंदाज आहे. ऋतुचक्रातील बदल हे पर्यावरण बदलाचे लक्षण आहे. पावसामुळे ऑक्टोबर हिट कमी राहिल. हवामान बदल, ऋतुमानातील बदल यामुळे यावर्षी पावसाळा जास्त काळ राहिला."
- डॉ. युवराज मोटे, पर्यावरण तज्ञ, भूगोल अभ्यासक