कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

IMD : रत्नागिरीसह राज्यात मुसळधार पावसाचा अलर्ट, वादळी वाऱ्यासह पाऊस बसरसणार

10:51 AM May 09, 2025 IST | Snehal Patil
Advertisement

राज्यातील काही भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता

Advertisement

रत्नागिरी : महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना पुन्हा एकदा गुरुवारी आयएमडीकडून पावसाचा ‘हाय अलर्ट’ देण्यात आला आहे. अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्याचाही समावेश आहे. कोकणापर्यंत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने वादळी वाऱ्यासह पाऊस बरसण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

Advertisement

दरम्यान, गुरुवारी सकाळी रत्नागिरी शहर परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली. 15 मिनिटेच पडलेल्या पावसाने साऱ्यांचीच धावपळ उडाली. संगमेश्वर, लांजा, राजापुरातही जोरदार पाऊस पडल्याने आंबा उत्पादकांसह व्यापारी चिंतेत सापडले आहेत.

गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये जोरदार पाऊस पडत आहे. या पावसाचा मोठा फटका हा शेतकऱ्यांसह साऱ्यांनाच बसला आहे. गेल्या 2 दिवसांपासून महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये जोरदार पाऊस पडत आहे. बुधवारी पहाटेपासून सकाळपर्यंत अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. काही ठिकाणी शेती, बागायतींचे नुकसान, घरांची पडझड, ओव्हरहेड वायरवर झाडाच्या फांद्या कोसळल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते.

दरम्यान, गुरुवारी पुन्हा एकदा आयएमडीकडून महाराष्ट्रातील अनेक जिह्यांना पावसाचा हाय अलर्ट देण्यात आला आहे. महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवेचा वेगही या काळात प्रचंड राहणार असल्याचा अंदाज आहे.

हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेल्या अंदाजानुसार, आज कोकण, मध्य महाराष्ट्र व मुंबईत जोरदार पावसाची शक्यता आहे. मध्यप्रदेशपासून ते कोकणापर्यंत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील जवळपास सर्वच जिह्यात हवामान विभागाकडून पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे.

रत्नागिरीत गुरुवारी सकाळीच जोरदार बरसात

गेल्या दोन दिवसांपासून जिल्हाभरात पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास अनेक भागात वादळी पावसाचा दणका बसला. विजांच्या कडकडाटासह कोसळलेल्या पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली. अनेक भागात नुकसानीच्या घटना घडल्या. त्यानंतर गुरुवारी सकाळीही या पावसाने हजेरी लावली.

अचानक काळ्याकुट्ट ढगांनी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास आभाळ भरून येत पावसाला सुरूवात झाली. सुमारे 15 मिनिटेच जोरदार पाऊस कोसळला पण पाणीच-पाणी करून गेला. त्यानंतर सायंकाळच्या सुमारासही हलक्या पावसाच्या सरी अनेक भागात बरसल्या. त्यामुळे रत्नागिरीच्या बाजारपेठेत नागरिक, व्यापाऱ्यांची धावपळ उडाली होती.

आंबा उत्पादकासह व्यापारी चिंतेत

लांजा तालुक्यात गुऊवारी सकाळपासून काही ठिकाणी अवकाळी पावसाला सुऊवात झाली. तर लांजा शहरात सकाळी ढगाळ वातावरण झाले असताना सायंकाळी 5.15 वाजण्याच्या सुमारास अवकाळी पावसाने हजेरी लावली. शहरात सकाळपासून ढगाळ वातावरण व सोसाट्याचा वारा सुरू होता. त्यामुळे पाऊस येईल, असे चिन्ह असतानाच सायंकाळी पावसाने हजेरी लावली.

या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असला तरी आंबा उत्पादक व व्यापारी मात्र चिंतेत पडले आहेत. यावर्षी आंब्याचे पीक चांगले आले असून सध्या बाजारात हापूस आंब्याची आवक मोठ्या प्रमाणात आहे. अशा परिस्थितीत अवकाळी पाऊस आल्याने आंब्याच्या गुणवत्तेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. पावसामुळे आंब्याला डाग लागण्याची किंवा तो खराब होण्याची भीती व्यापाऱ्यांमध्ये पसरली आहे. एकीकडे आंबा व्यापाऱ्यांमध्ये भीती असताना दुसरीकडे लग्नाचा हंगाम जोरात सुरू आहे.

ऐन लग्नसराईत अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे अनेक ठिकाणी नियोजित कार्यक्रमांमध्ये आयोजकांची तारांबळ उडाली दिसत आहे. मंडप व इतर व्यवस्थापनावर याचा परिणाम होत असून ऐनवेळी धावपळ करावी लागत आहे.

राजापुरातही अवकाळी पावसाची हजेरी

राजापूर तालुक्यात गुरुवारी सकाळी अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. शहरात भरलेल्या आठवडा बाजारात खरेदीसाठी गर्दी झाली असताना अचानक जोरदार पाऊस कोसळू लागल्याने ग्राहकांसह व्यापाऱ्यांचीही धावपळ उडाल्याचे पहायला मिळाले. दरम्यान आंबा पिकाचा हंगाम अंतिम टप्प्यात असताना तालुक्यात वादळी पावसाने हजेरी लावल्याने बागायदारांचेही मोठे नुकसान होणार आहे. शहर व लगतच्या भागात गुऊवारी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास अचानक अवकाळी पावसाने हजेरी लावली.

तालुक्याच्या अन्य ग्रामीण भागातही वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळला. तालुक्याच्या पूर्व भागातील सौंदळ, रायपाटण, पाचल, ओणीसह सर्वच परिसरात गुऊवारी सकाळी पावसाच्या जोरदार सरी बरसल्याने वातावरणात सुखद गारवा निर्माण झाला आहे. दरम्यान गुऊवारी भरणारा आठवडा बाजार पाहता ग्रामीण भागातील ग्रामस्थ अगोटच्या खरेदीसाठी बाजारात दाखल झाले होते. त्यातच लग्नसराईचा जोर असल्याने बाजारात मोठ्या प्रमाणावर गर्दी होती. अशातच पावसाने जोरदार हजेरी लावल्याने ग्राहकांसह व्यापारीवर्गाची धावपळ उडाली.

आठवडा बाजारातील अनेक व्यापाऱ्यांचा माल पावसाने भिजल्याने त्यांना काही प्रमाणात नुकसानीचा सामना करावा लागला. अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे आठवडा बाजार परिसरात चिखलाचे साम्राज्य पसरल्याने ग्राहकाना चिखलातून खरेदी करावी लागली. साधारण अर्धा तास बरसलेल्या या अवकाळी पावसाने उष्म्याने हैराण झालेल्या नागरिकांना काहीसे समाधान लाभले. मात्र हापूस आंब्याचा हंगाम अंतिम टप्प्यात असताना वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळल्याने आंबा पिकाचे मोठे नुकसान होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

दापोलीत पावसाचा शिडकावा

दापोली : तालुक्यात दोन दिवस ढगाळ वातावरण निर्माण असून पावसाचा शिडकावा झाला. बुधवारी रात्री पावसाने हजेरी लावली तरी पहाटे ढगाळ वातावरण होते व दिवसभर उन्हाचे चटके सोसावे लागले. गुरुवारीही ढगाळ वातावरण होते व रात्री शिडकावा केला. बुधवारी पहाटेपासून दापोलीत ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. पावसाळ्यापूर्वीची बरीच कामे अजून बाकी असल्याने त्यात ढगाळ वातावरण व अवकाळी पावसाचा शिडकावा सुरू झाल्याने ग्रामस्थांची धावपळ उडत आहे. दापोलीत आतापर्यंत या वर्षात 10.3 मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे.

संगमेश्वरात जोरदार पावसामुळे उडाली तारांबळ

संगमेश्वर : शहर परिसरात गुऊवारी सकाळच्या दरम्यान आलेल्या जोरदार पावसामुळे सर्वांची धांदल उडाली. दोन दिवसांच्या ढगाळ वातावरणानंतर आलेल्या पावसामुळे हवेमध्ये गारवा आला आहे. सकाळी 9.30 ते 10 च्या दरम्यान हा पाऊस पडला. आंबा, काजू, करवंद हंगाम सुरू असतानाच आलेल्या पावसामुळे नुकसान होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पावसानंतर मात्र हवेत गारवा आला होता. दुपारनंतर ऊनही पडले होते.

Advertisement
Tags :
#Dapoli#high-alert#imd#rain update#ratngiriupdate#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMediakonkan rain update
Next Article