Weather update जलधारा ते घामाच्या धारा कमाल, किमान तापमानात वाढ
त. भा. प्रतिनिधी पुणे
राज्याला झोडपल्यानंतर पावसाने सध्या ब्रेक घेतला असून, कमाल तसेच किमान तापमानात वाढ झाल्याने घामाच्या धारांनी नागरिक त्रस्त होत आहेत. राज्याचा तापमानाचा पारा पस्तीशीपार पोहोचला आहे.
1 जुलै ते 8 जुलै दरम्यान राज्याच्या अनेक भागाला मुसळधार पावसाने झोडपून काढले. गुरुवारनंतर पावसाचा मारा कमी झाला असून, अनेक भागात कोरडे हवामान पसरले आहे.
यामुळे कमाल तसेच किमान तापमानात वाढ झाली आहे. दुपारच्या सुमारास उकाडा जाणवत असून, घामाच्या धारा लागल्या आहेत. अनेक भागात पारा 35 अंश सेल्सिअसच्या वर गेला आहे. दुपारी कडाक्याच्या उन्हामुळे चटका जाणवत आहे.
दरम्यान राज्यात पुढील दोन दिवस कोणताही हवामानाचा अलर्ट देण्यात आलेला नाही. दमदार पावसामुळे राज्याच्या जलसाठ्यात भर पडली आहे. तसेच पुढील काही दिवसांत राज्यात पाऊस सरासरीपेक्षा कमी राहणार असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे.
राज्यातील पूरस्थिती ओसरल्याने दिलासा मिळाला आहे. देशात बिहार, उत्तर प्रदेश, पूर्वोत्तर भारतात पावसाची शक्यता आहे, तर पूर्वकिनारपट्टीवर उष्णतेच्या लाटेची शक्यता पुढील दोन दिवस आहे. दोन दिवसांनी विदर्भाच्या काही भागात पावसाची शक्यता आहे.