पावसाची उसंत; पूर ओसरला
सातारा, नवारस्ता :
केयना पाणलोट क्षेत्रासाहित जिल्ह्यात गुरुवारी पावसाने उसंत दिली. परिणामी कोयना धरणाचे 13 फुटांवर उचलण्यात आलेले सहा वक्र दरवाजे गुरुवारी कमी करून ती साडे चार फुटांवर ठेवण्यात आली.
दरम्यान, कोयना नदीची पाणी पातळी कमी झाल्यामुळे नदीवरील नेरळे, निसरे हे महत्वपूर्ण पुलावरील पाणी ओसरून पूल खुले झाले तर हेळवाक येथे कराड-चिपळूण रस्त्यावरील पाणी ओसरल्याने कराड-चिपळूण महामार्ग ही वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे.
गुरुवारी सकाळपासूनच पाणलोट क्षेत्रासाहित पाटण तालुक्यातील पावसाचा जोर कमी कमी होत गेला. परिणामी कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे गुरुवारी सकाळी सहा वाजता प्रथम दोन फुटांनी कमी केले. त्यानंतर दहा वाजता दोन फुटांनी कमी करण्यात आले तर पावसाचा जोर अधिकच कमी झाल्यामुळे गुरुवारी दुपारी तीन वाजता आणखी दोन फुटांनी कमी करून सायंकाळी सहा वाजता पुन्हा अडीच फुटांनी कमी करण्यात आले. ते साडे चार फुटांवर ठेवून कोयना नदीपात्रात प्रतिसेकंद 56 हजार 700 क्युसेक विसर्ग सुरू ठेवण्यात आल्याची माहिती कोयना सिंचन विभागाने दिली.
गुरुवारी सकाळी आठ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत कोयनानगर येथे 17 (4014) मिलिमीटर, नवजा येथे 17 (4917) मिलिमीटर तर महाबळेश्वर येथे 14 (4647) मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे तर सायंकाळी पाच वाजेपर्यंत धरणात प्रतिसेकंद 56 हजार 182 क्युसेक इतक्या प्रचंड पाण्याची आवक सुरु होती. धरणाची पाणीपातळी 2158.08 फूट झाली असून धरणातील पाणीसाठा 99 टीएमसी इतका झाला आहे.
- महामार्ग, पूल खुले
कोयना नदीच्या महापुरात पाण्याखाली गेलेले नेरळे, मूळगाव, निसरे या महत्वपूर्ण तीन पुलापैकी नेरळे आणि निसरे हे दोन पुलावरील पाणी ओसरले तर मूळगाव पुलावरील पाणीही गुरुवारी रात्रीपर्यंत ओसरेल, अशी अपेक्षा आहे. तर हेळवाक येथे महामार्गावरील पाणी ही ओसरले असल्याने कराड-चिपळूण महामार्ग वाहतुकीसाठी खुला झाला आहे.
- पाटण तालुक्यातील 16 घरांची पडझड
पाटण तालुक्यात गेल्या चार पाच दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे तालुक्यातील 16 गावांतील घरांची पडझड होऊन अंशत: नुकसान झाल्याची तहसीलदार अनंत गुरव यांनी दिली. यामध्ये त्रिपुडी, येराड, काळगाव, जितकरवाडी, धडामवाडी, आंबेघर तर्फ मरळी, किल्ले मोरगिरी, धावडे, दाढोली, कराटे, पाटण, मारुल तर्फ पाटण आणि नेरळे या गावांतील प्रत्येकी एका घराचा समावेश आहे.