For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पश्चिम भागात वादळी वाऱ्यासह पावसाचा धुमाकूळ

10:26 AM May 24, 2024 IST | Tarun Bharat Portal
पश्चिम भागात वादळी वाऱ्यासह पावसाचा धुमाकूळ
Advertisement

वार्ताहर/किणये

Advertisement

तालुक्याच्या पश्चिम भागात गुऊवारी वादळी वाऱ्यासह वळिवाच्या पावसाने धुमाकूळ घातला. जोरदार पावसामुळे रस्त्यावर व गावातील गल्ल्यांमध्ये पाणीच पाणी दिसून आले.वादळी वाऱ्यासह गारांचा या भागात पाऊस झाला. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. गेल्या दहा-बारा दिवसांपासून या परिसरात वळिवाचा पाऊस होऊ लागला आहे. गुऊवारी दुपारनंतर बेळवट्टी, इनाम बडस, बाकनूर, बेळगुंदी, सोनोली या भागात मुसळधार पाऊस झाला. वादळी वाऱ्याच्या पावसामुळे बऱ्याच ठिकाणी झाडांच्या फांद्या मोडून पडल्या आहेत. पावसामुळे शेत-शिवारामध्ये बऱ्यापैकी ओलावा निर्माण झाला आहे. यामुळे खरीप हंगामातील पेरणीपूर्व मशागतीच्या कामाला जोर आला आहे. मात्र वारंवार होणाऱ्या पावसामुळे भाजीपाला पिकांचे नुकसान झाल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. गुऊवारी सायंकाळी किणये, पिरनवाडी, मच्छे परिसरातही पाऊस झाला. यामुळे काहीजणांच्या घरांमध्ये व दुकानांमध्ये पावसाचे पाणी शिरले होते. हे पाणी काढताना नागरिकांची तारांबळ उडाली होती.

बेळवट्टीत दोन घरांचे पत्रे उडाले

Advertisement

बेळवट्टी परिसरात गुऊवारी वादळी वाऱ्याचा पाऊस झाला. यामुळे बेळवट्टी गावातील दोन घरांचे पत्रे उडून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ढगफुटीसारख्या झालेल्या पावसामुळे साऱ्यांचीच तारांबळ उडाली होती. शेतशिवारात मोठ्या प्रमाणात पाणी साचले. तसेच भागातील नदी नाले ही प्रवाहित झाले होते. वादळी वाऱ्याच्या पावसामुळे बेळवट्टी गावातील बंडू गाडेकर व रमेश कणबरकर या दोन शेतकऱ्यांच्या घरावरील पत्रे उडाले. यामुळे त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

बिडी येथे झाड पडल्याने कित्तूर-बिडी रस्ता बंद

बिडी परिसरात गुरुवारी दुपारी तब्बल दोन तास वाऱ्यासह पाऊस झाला. वाऱ्यामुळे कित्तूर, बिडी रस्त्यादरम्यान बिडी प्राथमिक शाळेसमोर झाड रस्त्यावर पडल्याने तीन तास रस्ता बंद झाला होता. दरम्यान कित्तूर-बिडी रस्त्यावरील वाहतूक हिंडलगी मार्गे वळविण्यात आली होती. बिडी परिसरात गुरुवारी दुपारी 4 वाजता जोराच्या वाऱ्यामुळे झाड रस्त्यावर कोसळले. सायंकाळी उशिरापर्यंत पाऊस सुरूच होता. रस्त्यावर झाड कोसळल्याने वाहतुकीची कोंडी झाली होती. सायंकाळी 6 वाजेपर्यंत रस्त्यावर पडलेले झाड हटविण्यासाठी कोणीही उपस्थित नव्हते. त्यामुळे रस्त्यावरची वाहतूक हिंडलगी मार्गे वळविण्यात आली.

Advertisement
Tags :

.