परतीच्या पावसाचा दणका
पावसामुळे झाडे कोसळून इमारतीसह वाहनांचे नुकसान : बुधवारी दिवसभर रिपरिप
बेळगाव : परतीच्या पावसाने सलग तिसऱ्या दिवशी बेळगाव शहरासह ग्रामीण भागाला दणका दिला. मंगळवारी सायंकाळपासून सुरू असलेली संततधार बुधवारी दिवसभर होती. यामुळे दिवसभर सर्वत्र ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. वारा व पावसामुळे झाडे कोसळून इमारतीसह वाहनांचे नुकसान झाले आहे. मागील काही दिवसांपासून उसंत घेतलेल्या पावसाने सोमवारपासून पुन्हा जोर धरला आहे. सोमवारी तुरळक पडणारा पाऊस मंगळवारी दुपारनंतर वाढत गेला. बुधवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण असल्याने शहराच्या काही भागात पावसाची रिपरिप सुरू होती. सततच्या पावसामुळे दिवसभरात सूर्यदर्शन झाले नाही.
पावसाचा फटका दांडिया आयोजकांनाही बसला. पावसामुळे मंगळवारी व बुधवारीही दांडिया खेळणाऱ्यांची संख्या मंदावल्याचे दिसून आले. त्याचबरोबर काही नवरात्रोत्सव मंडळांनी महाप्रसादाचे आयोजन केले होते. त्या मंडळांनाही पावसाचा सामना करावा लागला. सध्या बेळगाव व हुक्केरी तालुक्यात सोयाबीन काढणी जोमात सुरू आहे. परंतु परतीच्या पावसामुळे सोयाबीन काढणीसह मळणीलाही फटका बसला. मंगळवारी दुपारनंतर झालेल्या जोरदार पावसामुळे सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले. धामणे, के. के. कोप्प, नागेनहट्टी परिसरातील शेतकऱ्यांचे यामध्ये नुकसान झाले. अनगोळ, वडगाव, शहापूर शिवारातील भातपिके पावसाच्या माऱ्यामुळे आडवी झाली. यामुळे शेतकऱ्यांना फटका बसला.
अनेक ठिकाणी वृक्ष कोसळून नुकसान
मंगळवारी रात्रीपासून सुरू असलेल्या पावसाच्या संततधारेमुळे क्लब रोड येथील कमर्शियल टॅक्स कार्यालय परिसरातील एक वृक्ष कोसळला. कार्यालयाच्या पार्किंगमध्ये लावण्यात आलेल्या दोन वाहनांवर हा वृक्ष कोसळल्याने पत्र्याच्या छतासह वाहनांचे नुकसान झाले. याचबरोबर शहराच्या इतर भागातही झाडे पडून नुकसान झाले आहे.