लग्न सोहळ्यांवर पावसाच्या ‘अक्षता’
दापोली / प्रतिक तुपे :
मे महिन्यातील ऐन लग्नसराईत पावसाचे आगमन झाले आहे. लग्नसोहळ्यात नवरा-नवरीवर जणू पावसाच्या ‘अक्षता’ पडत आहेत. वरातीही पावसातूनच काढाव्या लागत आहेत. दारी उभारलेले मंडप व इतर यंत्रणा भिजल्याने लग्नसराईच्या उत्साहात हा ‘बिन बुलाया मेहमान’ यजमानांसह पाहुण्या चाकरमान्यांच्या आनंदावर विरजण घालताना दिसत आहे.
दापोलीत चार दिवस पडत असलेल्या पावसाने गुरुवारीही आपली रिपरिप कायम ठेवली होती. एप्रिल व मे महिना हा लग्नसराईचा महिना मानला जातो. मे महिन्यात सुट्ट्या मिळत असल्याने अनेकजण मे महिन्यात लग्नाचा मुहूर्त काढतात. यावर्षीही मोठ्या संख्येने लग्न समारंभ सुरू आहेत. परंतु अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने पावसाने सर्वच तयारीवर ‘विरजण’ घातले आहे. अनेकांच्या हळदीत पावसाच्या सरी बरसल्याने अनेकांनी ‘गोविंदा रे गोपाळा’चा ठेका धरल्याचेही पहायला मिळाले. हा मजेचा भाग असला तरी लग्न समारंभांना आलेले पाहुणे, ग्रामस्थांमधून नाराजी पहायला मिळत आहे. यात मंडप, लाऊडस्पीकर, विद्युत रोषणाई भिजून नुकसानही होत आहे.
- पाणीटंचाईच्या समस्येतून दिलासा
दापोलीत अनेक गावांमध्ये पाण्याची समस्या निर्माण झाली होती. एकंदरीत उन्हाचे चटके पाहता पाण्याची पातळी कमी होऊन अनेक गावांना पाणी-पाणी करण्याची वेळ आली. परंतु सध्या कोसळत असलेल्या पावसामुळे झऱ्यांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे पाणीटंचाईच्या समस्येतून दिलासा मिळाला आहे.
- वादळाचे संकेत नाहीत
दापोलीत गेले 3 दिवस जोरदार पाऊस कोसळत आहे. यातच वादळ समुद्रामार्ग मुंबईत धडकणार असल्याच्या बातम्याही येत आहेत. मात्र तशा कोणत्याही वादळाचे अद्याप संकेत नसल्याचे डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या हवामान विभागाकडून समोर आले. मात्र 50 ते 60 कि.मी. प्रति तास वेगाने वारे वाहणार असल्याचे विद्यापीठाने स्पष्ट केले आहे. तसेच दापोलीत सध्या कोणत्याही आपत्तीची नोंद नसल्याचे तहसील कार्यालयाकडून समोर आले. आतापर्यंत 77.8 मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे.
- तापमानात घट, हवेत गारवा
गेले 2 महिने उष्णतेने वैतागलेल्या दापोलीकरांना हवेत निर्माण झालेल्या गारव्यामुळे दिलासा मिळाला. गुरुवारी सकाळी दापोलीचे कमाल तापमान 31 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 19.2 अंश सेल्सिअस असल्याची नोंद कृषी विद्यापीठाने केली आहे. मात्र थोडा वारा सुरू झाल्यावर लगेच वीजपुरवठा खंडित होत असल्याने महावितरणने केलेल्या मान्सूनपूर्व कामांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
- पावसामुळे आर्थिक फटका
अचानक आलेल्या पावसामुळे लग्नसराईशिवाय इतर कार्यक्रमांसाठी उभारलेले मंडप, लाईटची सजावट याचे नुकसान होत आहे. पावसाच्या पाण्यात भिजल्याने मंडपाच्या कापडावर डाग पडणे, शिवाय कापड फाटण्याची शक्यता असते. आता एलईडी लाईटचा वापर असल्याने त्याही लवकर खराब होतात. लाईटींगही शॉर्टसर्किटमुळे खराब होत असल्याने आर्थिक फटका बसत असल्याचे दापोलीतील मंडप डेकोरेटर व्यावसायिक संतोष गावडे यांनी सांगितले.