पाऊस शतकाच्या उंबरठ्यावर
दिवसभरात 3 इंच पावसाची नोंद: नद्यांच्या पाणी पातळीत वाढ
विशेष प्रतिनिधी/ पणजी
गोव्यात पाऊस आक्रमक झाला असून गेल्या 24 तासांत अनेक भागांना त्याने झोडपून काढले. उत्तर गोव्याच्या तुलनेत दक्षिण गोव्यात मुसळधार वृष्टी झाली असून सरासरी 3 इंच नोंद झाली. यामुळे गोव्यात पाऊस शतकाच्या उंबरठ्यावर पोहोचला. 1 जूनपासून आतापर्यंत संपूर्ण गोव्यात 96 इंच एवढी नोंद झालेली आहे. दिवसभर कोसळल्यानंतर सायंकाळी काही भागात पावसाचे प्रमाण कमी झाले.
गेले चार दिवस सर्वत्र कोसळत असलेल्या पावसामुळे राज्यभरातील अनेक नद्यांच्या पाण्याची पातळी पात्राबाहेर पोहोचली. म्हादई नदीला वाढलेले पाणी पाहता आसपासच्या गावांना धोक्याची सूचना देण्यात आली होती. गोव्यात पावसाने धुमाकूळ घातला. मंगळवारी देखील सर्वत्र मुसळधार पाऊस पडला. पणजीत सायंकाळी 5.30 वा.पर्यंत दीड इंच पावसाची नोंद झाली. गोव्यातील सर्वाधिक पावसाची नोंद सांगे येथे झाली असून तिथे गेल्या 24 तासात 5.50 इंच पाऊस पडला. केपे येथे 4.50 इंच, काणकोण 4 इंच, मडगाव 4 इंच, धारबांदोडा 3.50 इंच, पेडणे व फोंडा प्रत्येकी 3 इंच, जुने गोवे 2.50 इंच, सांखळी 2.5 इंच, दाबोळी 2.25 इंच, म्हापसा 2 इंच, पणजी 1.75 इंच, सरासरी 3 इंच पावसाची नोंद झाली. हवामान खात्याने मंगळवारी ऑरेंज अलर्ट जारी केला होता. आज दि. 20 व उद्या दि. 21 रोजी यलो अलर्ट जारी केला असून या दरम्यान, गोव्यात सर्वत्र जोरदार पाऊस पडेल असा अंदाज व्यक्त केला आहे.
मंगळवारी गोव्यात सर्वत्र जोरदार पाऊस व सोबत जोरदार वारे वाहत होते. पुढील चार दिवस गोव्यात जोरदार पावसाबरोबरच वारे वाहतील. वाऱ्याचा वेग ताशी 60 कि.मी. पर्यंत पुढे जाऊ शकतो. मुसळधार पावसामुळे गोव्यातील विविध नद्यांच्या पाण्याची पातळी बरीच वाढली होती. मंगळवारी सायंकाळी उशिरा पावसाचा वेग मंदावला. अनेक ठिकाणी झाडे पडल्याचे वृत्त आहे.