आरसीबी, पंजाबवर पैशांचा पाऊस
विजेत्या संघाला 20 तर उपविजेत्या संघाला 12.5 कोटींचे बक्षीस : प्रसिध कृष्णा पर्पल तर साई सुदर्शन आँरेंज कॅपचा मानकरी
वृत्तसंस्था/अहमदाबाद
रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरने अखेर 18 वर्षांची प्रतीक्षा संपवत, आयपीएल ट्रॉफीवर नाव कोरले आहे. अंतिम सामन्यात आरसीबीने पंजाब किंग्जचा 6 धावांनी पराभव करून ऐतिहासिक विजय मिळवला. 18 वर्षांनी ट्रॉफी जिंकल्यामुळे आरसीबीच्या प्रत्येक खेळाडूसाठी आणि फॅनसाठी हा विजय खास आहे. आयपीएल विजेत्या आरसीबी व उपविजेत्या पंजाब संघांना कोट्यावधी रुपयांचे बक्षीस मिळाले आहे. याशिवाय, वेगवान गोलंदाज प्रसिध कृष्णा या स्पर्धेत पर्पल कॅपचा मानकरी ठरला तर युवा फलंदाज साई सुदर्शन ऑरेंज कॅपचा मानकरी ठरला. या स्पर्धेत तिसऱ्या स्थानी राहिलेल्या मुंबई इंडियन्सने 7 कोटींची तर चौथ्या स्थानावरील गुजरात टायटन्स संघाने 6.5 कोटींची कमाई केली.
आयपीएल 2025 चे विजेतेपद जिंकणाऱ्या संघाला 20 कोटी रुपये बक्षीस म्हणून मिळतील. 2022 पासून विजेत्या संघाला एवढी रक्कम मिळते तर अंतिम सामना हरणाऱ्या संघाला 12.5 कोटी रुपये मिळतील. आयपीएलच्या पहिल्या हंगामाच्या तुलनेत बक्षीस रकमेत चार पटीने वाढ झाली आहे. पहिल्या हंगामातील विजेत्या राजस्थान रॉयल्सला 4.8 कोटी रुपये मिळाले. त्याच वेळी, पराभूत झालेल्या चेन्नई सुपर किंग्जला 2.4 कोटी रुपये मिळाले. याचसोबत एलिमिनेटरमधून बाहेर पडणाऱ्या संघाला गुजरात टायटन्सला 6.5 कोटींची रक्कम मिळेल. याचवेळी, दुसऱ्या क्वालिफायरमधून बाहेर पडणाऱ्या मुंबई इंडियन्सला 7 कोटी रुपये मिळतील. याशिवाय, संघाला फेअर प्ले पुरस्कार देखील देण्यात येतो.
आयपीएल विजेत्या संघांना मिळालेली रक्कम
- विजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळूर-20 कोटी
- उपविजेता पंजाब किंग्ज-12.5 कोटी
- तिसरे स्थान मुंबई इंडियन्स-7 कोटी
- चौथे स्थान गुजरात टायटन्स-6.5 कोटी
आयपीएलमध्ये पुरस्कार विजेत्यांची यादी -
- सर्वाधिक धावा (ऑरेंज कॅप)-साई सुदर्शन (759 धावा), 10 लाख
- सर्वाधिक विकेट (पर्पल कॅप)-प्रसिध कृष्णा (25 विकेट), 10 लाख
- इमर्जिंग प्लेअर ऑफ द सीजन-साई सुदर्शन, 10 लाख
- मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर ऑफ द सीजन-सूर्यकुमार यादव, 15 लाख
- सुपर स्ट्रायकर ऑफ द सीजन-वैभव सूर्यवंशी, 10 लाख व टाटा कर्व्ह कार
- सीझनमध्ये सर्वाधिक सिक्स-निकोलस पूरन, 10 लाख
- सीझनमध्ये सर्वाधिक डॉट बॉल-मोहम्मद सिराज, 10 लाख
- सीझनमधील सर्वोत्तम कॅच-कमिंदू मेंडिस, 10 लाख
- सीझनमध्ये सर्वाधिक चौकार-साई सुदर्शन 10 लाख
- फेअर प्ले अवॉर्ड : चेन्नई सुपर किंग्स
- पिच अँड ग्राउंड अवॉर्ड : (दिल्ली डिस्ट्रिक्ट अँड क्रिकेट असोसिएशन), 50 लाख.