For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शिराळा पश्चिम भागाला सलग दुसऱ्या दिवशीही पावसाने झोडपले; बिळाशी ते कोकरूड रोडवर वाहतूक ठप्प

09:39 PM May 21, 2024 IST | Abhijeet Khandekar
शिराळा पश्चिम भागाला सलग दुसऱ्या दिवशीही पावसाने झोडपले  बिळाशी ते कोकरूड रोडवर वाहतूक ठप्प
Shirala West Traffic stopped
Advertisement

कोकरूड वार्ताहर

Advertisement

कोकरूड,बिळाशी, चिंचोली आदी गावांना वादळी पावसाने दुसऱ्या दिवशीही झोडपले तर बिळाशी परिसरात ढगफुटी सदृश पाऊस पडल्याने बिळाशी ते कोकरूड रोडवरील ओढ्याला पूर आल्यामुळे या रस्त्यावरील वाहतूक आर्धा तास बंद झाली होती. वीज वितरण व्यवस्था दुसऱ्या दिवशी ही सुरू झाली नव्हती.

मंगळवारी दुपारी चारच्या सुमारास आलेल्या वादळी पावसाने अक्षरशः थैमान घातले.सुमारे अर्धा तास पडलेल्या या वादळी पावसाने धुमाकूळ घातला. या वेळी गारांची बरसात झाली.या पावसाने सगळा परिसर झोडून काढला.कोकरूड, चिंचोली, बिळाशी , मांगरुळ आदी परिसरात तुफान पाऊस पडला.

Advertisement

काल झालेल्या वादळी पावसामुळे वीज पुरवठा करणारे बरेच डांब जमीनदोस्त झाले होते, ते उभा करण्याचे काम वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्याकडून सकाळपासून सुरू होते. मात्र दुपारी तीनच्या सुमारास आलेल्या वादळी पावसाने हे काम थांबले. त्यामुळे दुसऱ्या दिवशीही वीजपुरवठा सुरळीत करण्यात वीज वितरण कंपनीला यश आले नाही.सोमवारी दुपारी झालेल्या पावसापासून दुसऱ्या दिवशी सायंकाळपर्यंत विद्युत पुरवठा बंद होता त्यामुळे गावांच्या पाणी पुरवठा योजना ठप्प झाल्याने ग्रामस्थांना पाण्यासाठी इतरत्र भटकावे लागत आहे.

बिळाशी परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस पडला आणि बिळाशी ते कोकरूड रस्त्यावरील ओढ्याला पूर आल्यामुळे मुख्य रस्त्यावर पाणी आले आणि सुमारे अर्धा तास वाहतूक बंद राहिली. या पावसामुळे शिवारातील सर्व शेती पाण्याने भरली याचा परिणाम भात पूर्व मशागतीवर होणार आहे. असाच पाऊस राहिला आणि मान्सूनचे आगमन झाले तर भात पेरणीवर संकट उभे राहणार हे नक्की आहे.

Advertisement

.