शहरी भागांना पावसाने झोडपले
जनजीवन विस्कळीत, अनेक रस्ते पाण्याखाली : पणजीत तब्बल 4 इंच पावसाची नोंद
पणजी : हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केला आणि सत्तरीमध्ये संभाव्य पुरामुळे होणाऱ्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी प्रशासनाने जोरदार तयारी केली. मात्र अधिकतम पाऊस पणजी, फोंडा, मडगाव, पेडणे, म्हापसा, काणकोण, सांगे आदी भागात कोसळला. राजधानी पणजीसह अनेक भागात जनजीवन विस्कळीत झाले. पणजीत सकाळच्या प्रहरी पडलेला पाऊस 4 इंच झाला. शहरातील विविध भागांना नद्यांचे स्वऊप प्राप्त झाले. मात्र दुपारपासून पावसाचा जोर ओसरला. हवामान खात्याने मंगळवारी सायंकाळी जारी केलेल्या माहितीनुसार आज बुधवारकरिता ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. रेड अलर्ट जाहीर करण्यात आला खरा, परंतु सत्तरीत मंगळवारी सोमवारच्या तुलनेत अत्यल्प पाऊस पडला. त्यामुळे सांखळीच्या वाळवंटीला पूर आला नाही. म्हादई नदीलाही पूर आलेला नव्हता. सांखळी, डिचोलीत सकाळपासून जोरदार पाऊस पडला. होंडा, मोर्ले व वाळपईत देखील जोरदार पाऊस पडून गेला. मात्र कुठेही पूरसदृश स्थिती निर्माण झाली नाही. त्यामुळे प्रशासनानेही सुटकेचा नि:श्वास सोडला.
पणजीत 4 इंच पावसाची नोंद
पणजी वेधशाळेमध्ये सकाळी 8.30 ते सायंकाळी 5.30 या दरम्यान तब्बल 4 इंच पावसाची नोंद झाली. पणजीत सकाळी 9 च्या दरम्यान सुरू झालेला पाऊस दुपारी 2 वा.पर्यंत राहिला. प्रत्यक्षात 11 पर्यंत मुसळधार पाऊस पडला आणि त्यानंतर किंचित पाऊस पडला. दुपारनंतर वातावरण ढगाळ राहिले, मात्र पाऊस झाला नाही. पेडणे, म्हापसा, मडगाव, फोंडा इत्यादी भागात सर्वत्र मुसळधार पाऊस झाला. फोंडा भागातील काही ठिकाणी नद्या, नाल्यांना पूर आला आणि काही तासांनंतर तो ओसरला.
पणजीत सर्वत्र पाणीच पाणी
पणजीत मात्र पावसाने सकाळीच झोडपून काढल्याने 18 जून रस्ता पाण्याखाली गेला. बांदोडकर रस्ता कला अकादमीपासून मिरामारपर्यंत पाण्याखाली गेला. इडीसी पाटोचे सारे रस्ते पाण्याखाली गेले. त्यामुळे वाहनधारकांची त्रेधा उडाली. पावसाचा जोर दुपारी कमी झाला आणि नंतर पाणी ओसरले. सायंकाळी उशिरापर्यंत गोव्यात सर्वत्र ढगाळ वातावरण होते. हवामान खात्याने बुधवारकरीता ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. या दरम्यान आजही सर्वत्र मुसळधार पाऊस पडेल, असा इशारा दिला आहे.
यंदा 44 टक्के अधिक पाऊस
मान्सूनने राजस्थान, गुजरात, पंजाब, हरियाणामधून आपल्या परतीचा प्रवास सुऊ केला आहे. मात्र सध्या गोव्यात मान्सून सक्रिय आहे. गेल्या 24 तासांमध्ये फोंडा 3 इंच, मडगाव 1.80 इंच, सांगे 1 इंच, दाबोळी 1 इंच, वाळपई 1 इंच, म्हापसा 1 इंच, मुरगाव 1 इंच, काणकोण 1 इंच, सांखळी पाऊण इंच व पणजी पाऊण इंच, तर पेडणेत अर्धा इंच पाऊस पडला. आज ऑरेंज अलर्ट जारी केला आहे तर उद्या यलो अलर्ट जारी केलेला आहे. गेल्या 24 तासांत सरासरी 1 इंच पावसाची नोंद झाली आहे. यंदाच्या मोसमात गोव्यात 168 इंच पावसाची विक्रमी नोंद झालेली आहे. हा पाऊस वार्षिक सरासरीच्या तुलनेत 44 टक्के अधिक झाला आहे. यंदा 52 इंच अतिरिक्त पाऊस गोव्यात पडलेला आहे.
वाळपईत आतापर्यंत 218 इंच पाऊस
यंदाच्या मोसमात गोव्यात सर्वाधिक पाऊस वाळपईत झालेला असून तिथे 218 इंच पावसाची नोंद झाली आहे. सांगेमध्ये 210.50 इंच पावसाची नोंद झाली आहे. सांखळीमध्ये 185 इंच तर केपेमध्ये 184 इंच पाऊस झाला आहे. अंजुणे धरण क्षेत्रात मात्र आतापर्यंत 227 इंच एवढा विक्रमी पाऊस पडलेला आहे.