राजधानी पणजीला पावसाने झोडपले
अवघ्या दीड तासात तीन इंच पाऊस : अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली,ठिकठिकाणी नरकासूर प्रतिमांचे नुकसान
पणजी : रविवारच्या पावसानंतर सोमवारी सायंकाळी उशिरा उत्तर गोव्यातील विविध भागात पावसाने अक्षरश: झोडपून काढले. पणजीमध्ये मुसळधार पाऊस सायंकाळी उशिरा पडला. अवघ्या तासाभरात पणजीचे अनेक रस्ते पाण्याखाली गेले. पणजीत दीड तासात पावणेतीन इंच पावसाचा विक्रम झाला. या पावसाचा व त्याचबरोबर आलेल्या वाऱ्याचा वेगही बराच मोठा होता. गेले दहा दिवस कष्ट करून उभारलेल्या अनेक नरकासूर प्रतिमांनी मान आडवी टाकली. पणजीत सायंकाळी काही वृक्ष उन्मळून पडले. दि. 1 नोव्हेंबरपर्यंत दररोज मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज व्यक्त करून हवामान खात्याने यलो अलर्ट जारी केला आहे.
शहरातील रस्ते पाण्याखाली
अवघ्या तासा-दीड तासात पावणेतीन इंचपेक्षाही जादा पाऊस कोसळल्याने रात्रीच्यावेळी पणजीत किती नुकसान झाले याचा अंदाज काही लागला नाही. परंतु पणजीतील 18 जून रस्तासहीत अनेक रस्ते पाण्याखाली गेले. वाहनचालकांचे अक्षरश: हाल झाले. अनेक दुकानांमध्ये पाणी घुसल्याने दुकानदारांचेही नुकसान झाले. कित्येक ठिकाणी वृक्ष कोसळल्याचेही वृत्त आहे. पुढील चार दिवस गोव्यात सर्वत्र पाऊस थैमान घालण्याची शक्यता आहे. प्राप्त माहितीनुसार रविवारप्रमाणेच सोमवारी पावसाने साखळीला झोडपून काढले. तिथेही अनेक रस्ते पाण्याखाली गेले. आमोणे, माशेल, कुंभारजुवे, जुने गोवे, फोंडा तसेच सत्तरीतील काही भागाला पावसाने अक्षरश: झोडपून काढले.