For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पाऊस नव्या विक्रमाच्या तयारीत..!

12:37 PM Jul 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
पाऊस नव्या विक्रमाच्या तयारीत
Advertisement

आतापर्यंत 53 टक्के जादा पाऊस : गेल्या 24 तासांत वाळपईत 8 इंच पाऊस,आजही रेड अलर्ट जारी

Advertisement

पणजी : पावसाने पुन्हा एकदा गोव्याला झोडपून काढले. वाळपईत सर्वाधिक 8 इंच पावसाची नोंद गेल्या 24 तासांमध्ये झाली. गुऊवारी हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केला व आज शुक्रवारी देखील मुसळधार पावसाचा इशारा देत हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केला. गोव्यात पाऊस यंदा एक नवा विक्रम करीत असून शतकाच्या उंबरठ्यावर तो पोहोचला आहे. दरम्यान, वाळपई, सांगे पाठोपाठ सांखळी, फोंडा या ठिकाणी देखील पावसाने इंचांचे शतक ठोकले आहे. राज्यात पावसाची संततधार चालूच आहे. आगामी 48 तास मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. गेले 14 दिवस गोव्यातील जनतेला सूर्यदर्शन झालेले नाही आणि पाऊस मुळीच विश्रांती घेण्यास तयार नाही. पणजीसह राज्यातील सर्व ठिकाणी 6 जुलैपासून जी संततधार चालू आहे ती कायम आहे. गुऊवारी हवामान खात्याने रेड अलर्ट दोन दिवसांसाठी जाहीर केला. त्यानुसार आज शुक्रवारी देखील गोव्यात सर्वत्र मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. पावसाने कहरच केल्यामुळे गोव्यातील सर्व नद्या दुथडी भऊन वाहत आहेत. तर काही नद्या या धोक्याच्या इशाऱ्यापर्यंत जाऊन पोहोचल्या आहेत. हवामान खात्याने मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर जनतेला सावध राहाण्याचा इशारा दिला आहे.

गेल्या 24 तासांमध्ये सर्वाधिक पावसाची नोंद वाळपईत झाली. तिथे 8 इंच पाऊस पडला. म्हापसा येथे 4 इंच, पेडणे 4 इंच, फोंडा 5 इंच, पणजी 4 इंच, सांखळी 6 इंच, काणकोण 4.50 इंच, दाबोळी 3 इंच, मडगाव 4.5 इंच, मुरगाव 4 इंच, केपे 4 इंच व सांगे येथे 5.5 इंच पावसाची नोंद झाली. गोव्यात पडत असलेल्या विक्रमी पावसामुळे सांखळी येथे पावसाने इंचाचे शतक गाठले. फोंड्यातही इंचाचे शतक पार केले. गुऊवारी राज्यात एकाच दिवशी 4.50 इंच पावसाची सरासरी नोंद झाली. त्यामुळे मोसमात पडलेला पाऊस हा आता 94 इंच झाला आहे. सरासरी 61 इंचांच्या तुलनेत 34 इंच जादा पाऊस पडलेला आहे. त्यामुळे यावर्षी पडलेला पाऊस हा आता सरासरीपेक्षा 53 टक्के जादा झालेला आहे. आज रेड अलर्ट आहे तर दि. 22 जुलैपर्यंत ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. दि. 23 आणि 24 जुलैसाठी कोणताही इशारा दिलेला नाही. पुढील तीन दिवस मात्र मुसळधार पावसाचे आहेत. मुसळधार पावसाने राज्याच्या जनजीवनावर परिणाम झाला आहे.

Advertisement

अंजुणे धरण क्षेत्रात सर्वाधिक 114 इंच पावसाची नोंद

दरम्यान, गोव्यातील सर्वाधिक पावसाची नोंद 114 इंच अंजुणे धरण क्षेत्रात  झालेली आहे. सध्या धरणात 91.30 मीटर एवढे पाणी आहे. मुसळधार पावसामुळे पाण्याची आवक वाढलेली आहे. गेल्या 24 तासांमध्ये अंजुणेमध्ये 4.50 इंच पाऊस पडलेला आहे.

Advertisement
Tags :

.