कसोटीच्या दुसऱ्या दिवशी पावसाचा अडथळा
वृत्तसंस्था /सिडनी
तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत येथे सुरू झालेल्या शेवटच्या कसोटीत गुरुवारी पाऊस आणि अंधुक प्रकाशामुळे केवळ 46 षटकांचा खेळ झाला. दरम्यान पाकच्या पहिल्या डावातील 313 या धावसंख्येला प्रत्युत्तर देताना यजमान ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 2 बाद 116 धावांपर्यंत मजल मारली. ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरची ही शेवटची कसोटी असून तो 34 धावांवर बाद झाला. चहापानानंतरचे शेवटचे सत्र पावसामुळे वाया गेले. ऑस्ट्रेलियाने पाक विरुद्धच्या या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी यापूर्वीच मिळविली आहे. या कसोटीतील खेळाच्या पहिल्या दिवशी पाकिस्तानचा पहिला डाव 313 धावांवर आटोपला. पाकतर्फे मोहम्मद रिझवान, आगा सलमान आणि अमिर जमाल यांनी शानदार अर्धशतके झळकवली. ऑस्ट्रेलियातर्फे कर्णधार कमिन्सने 61 धावात 5 तर स्टार्कने 2, हॅझलवूड, मार्श आणि लियॉन यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
ऑस्ट्रेलियाने बिनबाद 6 या धावसंख्येवरुन गुरुवारी दुसऱ्या दिवशीच्या खेळाला पुढे सुरुवात केली. वॉर्नर आणि ख्वॉजा यांनी पहिल्या गड्यासाठी 70 धावांची भागिदारी केली. मात्र उपाहारापूर्वीच ऑस्ट्रेलियाची ही सलामीची जोडी पाकच्या आगा सलमानने फोडली. सलमानच्या गोलंदाजीवर वॉर्नर बाबर आझमकरवी झेलबाद झाला. त्याने 68 चेंडूत 4 चौकारांसह 34 धावा जमविल्या. वॉर्नरची ही शेवटची म्हणजे 112 वी कसोटी आहे. या मालिकेनंतर डेव्हिड वॉर्नर कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होत आहे. उपाहारावेळी ऑस्ट्रेलियाने 30 षटकात 1 बाद 78 धावा जमविल्या होत्या. ख्वाजा 35 तर लाबुशेन 3 धावांवर खेळत होते. खेळाच्या दुसऱ्या सत्राला प्रारंभ झाला पण अंधुक प्रकाश आणि पावसाळी वातावरणामुळे या सत्रात केवळ 17 षटकांचा खेळ झाला. ऑस्ट्रेलियाचे शतक 234 चेंडूत फलकावर लागले. जलपाण घेण्यात आले त्यावेळी ऑस्ट्रेलियाने 45 षटकात 2 बाद 113 धावांपर्यंत मजल मारली होती. अमिर जमालने उस्मान ख्वॉजाला रिझवानकरवी झेलबाद केले. त्याने 143 चेंडूत 4 चौकारांसह 47 धावा जमविल्या. चहापानापूर्वीच पंचांनी पावसामुळे खेळ थांबविला त्यामुळे ऑस्ट्रलियाची स्थिती 47 षटकात 2 बाद 116 अशी होती. लाबुसेन 23 तर स्मिथ 2 धावावर खेळत होते. सातत्याने पाऊस सुरू झाल्याने पंचांनी शेवटच्या सत्रातील खेळ होणार नसल्याची घोषणा केली.
संक्षिप्त धावफलक
पाक प. डाव 77.1 षटकात सर्व बाद 313 (मोहम्मद रिझवान 88, आगा सलमान 53, अमिर जमाल 82, बाबर आझम 26, शान मसूद 35, कमिन्स 5-61, स्टार्क 2-75, हॅझलवूड 1-65, लियॉन 1-74, मार्श 1-27). ऑस्ट्रेलिया प. डाव 47 षटकात 2 बाद 116 (वॉर्नर 34, उस्मान ख्वाजा 47, लाबुशेन खेळत आहे 23, स्मिथ खेळत आहे 6, अवांतर 6, अमिर जमाल 1-26, आगा सलमान 1-18).