अखेर मंगळवारी पावसाची हजेरी; ढगाळ वातावरण
बेळगाव : मान्सूनच्या पावसाची वाट पाहणाऱ्या नागरिकांना अखेर मंगळवारी पावसाने हजेरी लावत दिलासा दिला. दिवसभर ढगाळ वातावरण राहिले असून अधूनमधून रिमझिम पाऊस सुरू होता. संध्याकाळी काही भागांत जोरदार पाऊसही झाला. मात्र जिल्ह्यातील काही भागात पावसाची अजूनही प्रतीक्षा आहे. अल निनोच्या प्रभावामुळे मृग नक्षत्रात अपेक्षित पाऊस न झाल्याने नागरिकांसह शेतकऱ्यांची चिंता वाढली होती. पिकांवर त्याचा परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात होती. पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांनी काही भागात पेरणी करून पिके जिवंत ठेवण्यासाठी पाण्याचा आधार घेतला होता.
बटाटा व रताळी पिकांची लागवड करण्यात आली होती; मात्र गेल्या 15 ते 20 दिवसांत पुरेसा पाऊस न पडल्याने बटाट्याचे नुकसान झाले आहे, तर रताळ्याचा वेल सुकू लागला होता. दरम्यान, 22 जूनपासून सुरू झालेल्या आर्द्रा नक्षत्रात किमान सात दिवस मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. यावेळी नद्या-नाले तुडुंब भरून वाहण्याची शक्मयता असून अतिवृष्टीमुळे भू-स्खलन होण्याचा इशाराही देण्यात आला आहे. मंगळवारी शहर व परिसरात सर्वत्र जोरदार पाऊस झाला नसला, तरी दिवसभर अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत होत्या. त्यामुळे नागरिकांसह शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.