दापोलीत पावसाने पार केला २ हजाराचा टप्पा
दापोली :
तालुक्यात कोसळणाऱ्या पावसाने जुलै महिन्यात २ हजार मि.मी.चा टप्पा पार केल्याची नोंद डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने केली आहे. मे महिन्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली व त्यानंतर सुरू झालेल्या नियमित पावसात वादळी वाऱ्यामुळे नागरिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले.
अरबी समुद्र, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे पावसाने डिसेंबर महिन्यातच हजेरी लावली होती. यामुळे यावर्षी फार पाणी टंचाईचा सामना दापोलीकरांना करावा लागला नाही. परंतु जून महिना रिक्त गेल्यानंतर जुलै महिन्यात पावसाने जोर धरला. दापोलीत पावसाने जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात २,३६९ मि.मी.चा टप्पा पार केला आहे. मागील वर्षी याच दिवसापर्यंत २,९४०.७ मि.मी. पावसाची नोंद कोकण कृषी विद्यापीठाने केली होती. सध्या दापोलीत वेगवान वाऱ्यांचा प्रवाह अधिक असून पाऊस सरीवर येत आहे. त्यामुळे गणपती व दसऱ्याच्या सणात नेमका पाऊस जोर धरण्याची शक्यता शेतकरी वर्गाकडून व्यक्त होत आहे.
- वादळी वाऱ्याने पाजपंढरीत घराचे नुकसान
दोन दिवस झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे पाजपंढरी येथील हिऱ्या कालेकर यांच्या घराचे ३ लाख ५० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. समुद्रकिनाऱ्यांवर सध्या वादळी वारे वाहत असून जोरदार सरींवर पाऊस देखील कोसळत आहे. यामुळे कच्चे बांधकामे, झाडे कोसळून नुकसान होत आहे. पाजपंढरी येथील नुकसानीचा महसूल अधिकारी अक्षय पाटील यांनी पंचनामा केला.