पावसाची रिपरिप सुरूच
जनजीवन गारठले; शेतीकामात व्यत्यय
बेळगाव : शहर आणि परिसराला पावसाने रविवारी सायंकाळी पुन्हा झोडपून काढले. दिवसभर उघडीप होती. आकाशात ढग क्वचितच दिसून येत होते. त्यामुळे पाऊस येणार नाही, असा अंदाज अनेकांकडून व्यक्त होता. मात्र अंदाज फोल ठरला. दुपारच्या दरम्यान अधूनमधून पावसाची रिमझिम सुरू होती. सायंकाळनंतर पावसाने जोर धरला. रविवारी सुटीचा दिवस असल्याने बाजारपेठेत गर्दी हेती. पाऊस सुरू झाल्याने ग्राहकांबरोबर विक्रेत्यांचीही तारांबळ उडाली.
मागील चार दिवसांपासून पावसाचा जोर कमी-अधिक प्रमाणात सुरूच आहे. अरबी समुद्र व बंगालच्या उपसागरातील हवामान प्रणालीमुळे जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने दोन दिवसांपूर्वी वर्तविली होती. मात्र, सतत होणाऱ्या पावसामुळे हवेत गारठा निर्माण होत असून जनता त्रासून गेली आहे. हवामानातील बदलामुळे सर्दी, खोकला यासारख्या तक्रारी वाढल्या आहेत. पंचांगातील माहितीनुसार गुऊवारपासून (दि.23) स्वाती नक्षत्र सुरू आहे. या नक्षत्रात अल्प प्रमाणात पाऊस होईल, असे म्हटले आहे. पण, नेमकी उलट परिस्थिती निर्माण झाली आहे.
आणखी पाऊस झाल्यास पिकावर परिणाम शक्य
सतत होणाऱ्या पावसामुळे शेतीकामात व्यत्यय येत आहे. सध्या भात कापणी सुरू असून पावसाने पुन्हा जोर धरल्याने शेतकरी चिंतातूर झाले आहेत. पुढील दिवसांतही पाऊस झाल्यास भात पिके वाया जाण्याची शक्यता शेतकरी बोलून दाखवित आहेत.