किनारपट्टीवर पावसाचा मारा सुरूच
देवीमने घाटात सलग तिसऱ्या दिवशी दरड कोसळली : गणपती मंदिर जलमय
कारवार : जिल्ह्याच्या किनारपट्टीवर पावसाचा जोरदार मारा सुरूच आहे. गोकर्ण येथे पावसाने आज रविवारी सकाळपासून थैमान घातले आहे. त्यामुळे गोकर्ण येथील सुप्रसिद्ध गणपती देवस्थान जलमय झाले आहे. कुमठा-शिरसी रस्त्यावरील देवीमने घाटात आज रविवारी सलग तिसऱ्या दिवशी दरड कोसळली आहे. त्यामुळे गेल्या तीन दिवसापासून या प्रमुख रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली आहे. शुक्रवारपासून देवीमने घाटात दरडी कोसळ्याच्या प्रकाराला सुरुवात झाली आहे. घटनास्थळावरून दरडी हटविण्याचे कार्य सुरू असतानाच पुन्हा दरडी कोसळत असल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे.
महागणपती मंदिर जलमय
सकाळपासून सुरू असलेला पावसाचा मारा व पावसाच्या पाण्याचा योग्यरित्या निचरा होत नसल्यामुळे गोकर्ण येथील महागणपती मंदिर जलमय झाले आहे. आज रविवार असल्याने भाविकांनी गणपतीच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. मंदिराबाहेर ठेवलेली पादत्राणे पावसाच्या पाण्यात वाहून गेल्याने भक्तांची मोठी पंचाईत झाली होती. गटारीतील पाणी रस्त्यावरून वाहत असल्याने भाविकांना घाण पाण्यातून जावे लागत होते, असे सांगण्यात आले. गोकर्णमध्ये पुढील काही दिवस पावसाचा जोर टिकून राहिलातर महाबळेश्वर देवस्थानातील आत्मलिंग पाण्याखाली जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
जिल्ह्यात चोवीस तासात एकूण 480 मि. मी पावसाची नोंद
जिल्ह्यात रविवारी सकाळी संपलेल्या चोवीस तासात एकूण 480 मि. मी. पावसाची आणि जिल्ह्यातील बारा तालुक्यात सरासरी 40 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. किनारपट्टीवरील तालुक्यात झालेल्या पावसाची नोंद अशी अंकोला 74 मि. मी., भटकळ 62 मि. मी., कुमठा 66 मि. मी., होन्नावर कारवार 74 मि. मी.