For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गोव्यात सर्वत्र पावसाची हजेरी

03:55 PM Jun 06, 2026 IST | Tarun Bharat Portal
गोव्यात सर्वत्र पावसाची हजेरी
Advertisement

पणजी : राज्याच्या अनेक भागात सायंकाळी सर्वत्र मध्यम तथा हलक्या स्वरूपात पावसाने हजेरी लावली. त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला. हवामान खात्याने 4 जून रोजी केरळमध्ये मान्सून पोहोचला असे जाहीर केले आणि लागलीच दुसऱ्या दिवशी म्हणजे काल शुक्रवारी तो गोव्याच्या काही भागात पोहोचला असा दावा केला आहे. त्याचबरोबर गोव्यात मान्सून सक्रिय होण्यासाठी आवश्यक वातावरण निर्मिती झालेली आहे, असे म्हटले आहे. राज्यात पावसाला अनुरूप असे वातावरण तयार झाले असून पुढील चार दिवस मध्यम तथा जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त करुन यलो अलर्ट जारी केले आहे. यादरम्यान जोरदार वाऱ्यासह आणि मेघगर्जनेसह पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. गेल्या 24 तासात सर्वाधिक अडीच इंच पावसाची नोंद काणकोण येथे झाली. मडगाव येथे पाऊण इंच तर धारबांदोडा येथे अर्ध्या इंच पावसाची नोंद झाली. मुरगाव, केपे, दाभोळी, साखळी  व म्हापसा येथे तुरळक पावसाची नोंद झाली. गेल्या 24 तासात सरासरी अर्धा इंच पावसाची नोंद झालेली आहे. आजपासून चार दिवस मेघगर्जनेसह व वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. राजधानी पणजी येथे सायंकाळी अर्धा तास पाऊस पडला. या पावसामुळे पारा खाली उतरला असून हवेतील गारव्याने नागरिकांना दिलासा मिळाला.

Advertisement

Advertisement
Tags :

.