पावसाळ्यापूर्वी रेल्वेकडून घाटमाथ्यावर दुरुस्तीचे काम
9 तास मेगा ब्लॉक : व्यवस्थापक बेला मीना यांची देखरेख, अनेक उपाययोजना
बेळगाव : नैर्त्रुत्य रेल्वेच्या हुबळी विभागांतर्गत येणाऱ्या लोंढा-वास्को मार्गावर शनिवारी मेगा लाईन ब्लॉक ऑपरेशन यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आले. हुबळी विभागीय व्यवस्थापक बेला मीना यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम राबविण्यात आली. तब्बल 9 तास 50 मिनिटे हा मेगा ब्लॉक घेण्यात आला होता. पावसाळ्याच्या दिवसात घाटमाथ्यावर अनेकवेळा दरड कोसळण्याची भीती असते. त्यामुळे प्रवाशांना कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी पावसाळ्यापूर्वीच मेगा ब्लॉक घेऊन दुरुस्तीची कामे करण्यात आली. काही ठिकाणी पावसाचे पाणी जोराने आल्याने
ट्रॅकखालील खडी वाहून जाण्याचा धोका होता. त्या ठिकाणी पाण्याचा निचरा होण्यासंदर्भात दुरुस्तीची कामे करण्यात आली. दरड कोसळण्याची शक्यता असलेल्या भागामध्ये पाण्याचा निचरा होण्यासोबतच दरड कोसळणार नाही, यासाठी अनेक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर दूधसागर ते सोनाळी व सोनाळी ते कुलेम या दरम्यानही अशाच प्रकारे ब्लॉक राबविण्यात आले. प्रवाशांचा रेल्वेप्रवास सुरक्षित व्हावा यासाठी या उपाययोजना केल्या जात असल्याचे बेला मीना यांनी सांगितले. यावेळी रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
डीआरएम मीना यांचे कामावर लक्ष
शनिवारी सकाळपासून कॅसलरॉक ते करंजोळ या दरम्यान आरसीसी बॉक्स ढकलण्याचे काम सुरू करण्यात आले. सकाळी 7 वाजल्यापासून सायंकाळी 5 वाजेपर्यंत असा एकूण 9 तास 50 मिनिटांचा मेगा ब्लॉक घेण्यात आला. या कामावर डीआरएम बेला मीना या लक्ष ठेवून होत्या.