वरिष्ठ राष्ट्रीय पुरूष कबड्डीत रेल्वे, तामिळनाडू, चंदीगडचे विजय
वृत्तसंस्था /बडोदा
येथील सामा इनडोअर कॉम्प्लेक्स येथे मंगळवारी 72 व्या वरिष्ठ राष्ट्रीय पुरुष कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेच्या पहिल्या दिवशी अनेक दमदार कामगिरी पाहायला मिळाली. ज्यामध्ये अनुभवी खेळाडू आणि उदयोन्मुख प्रतिभांनी त्यांच्या मोहिमांना दमदार सुरूवात केली.
आठ गटांमध्ये विभागलेले एकूण 29 संघ या स्पर्धेत सहभागी होत आहेत. पहिल्या दिवशी पूल ए ते एच पर्यंत आठ सामने खेळले गेले. चंदीगड, तामिळनाडू, भारतीय रेल्वे आणि गुजरातने आपापल्या सामन्यांमध्ये विजय मिळवला. दिवस उल्लेखनीय वैयक्तिक कामगिरीने देखील भरीव होता. गुजरातच्या मितेश प्रजापतीने 21 गुण मिळवून त्यांच्या संघाच्या विजयात निर्णायक भूमिका बजावली. विदर्भाचा आदेश वरखडे देखील 28 गुणांच्या प्रभावी प्रयत्नांसह आघाडीवर होता. मात्र संघ चार गुणांनी पराभूत झाला.
गट अ मध्ये चंदीगडने संपूर्ण वर्चस्व दाखवत झारखंडवर 76-32 असा 44 गुणांनी विजय मिळवला. गट ब मध्ये गेल्या वर्षाच्या उपविजेत्या भारतीय रेल्वेने आणखी एक दमदार कामगिरी केली. त्यांनी ओडिशाचा 73-23 असा 58 गुणांनी पराभव केला. नरेंद्र कंडोलाने 16 गुण मिळवले आणि त्यांच्या विजयात मोलाची भूमिक बजावली. पंजाब आणि गुजरात यांच्यातील गट क सामना अत्यंत चुरशीचा ठरला. गुजरातने पंजाबचा 46-44 असा निसटता पराभव केला. गट ड मध्ये तामिळनाडूने दिवसातील सर्वात प्रभावी कामगिरी बजावली. मणिपूरचा 75-16 असा पराभव करुन 59 गुणांनी एकतर्फी विजय मिळविला. गटातील दुसऱ्या सामन्यात उत्तरप्रदेश आणि विदर्भ यांच्यात चुरशीची लढत झाली. ज्यामध्ये उत्तरप्रदेशने चार गुणांनी विजय मिळविला.
प्रो कब•ाr लीग (पीकेएल) हंगाम 12 मध्ये तामिळ थलैवाजकडून खेळणारा यूपीचा कर्णधार अर्जुन देशवालने 15 गुण मिळवले आणि त्यांच्या संघाला विजय मिळवून दिला. पूल ई मध्ये हरियाणाने आंध्रप्रदेशवर 49-32 असा विजय मिळविला. पूल ई मध्ये केरळ आणि बिहार यांच्यातील पूल एफ मध्ये झालेल्या सामन्यातही जोरदार टक्कर झाली. त्यात बिहारने तीन गुणांनी विजय मिळविला.