रेल्वेकडून नव्या ‘सुपरअॅप’चा प्रारंभ
तिकिट रिझर्व्हेशन करणे होणार अधीक सोपे, 1 जुलैपासून व्यापक परिवर्तन लागू
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारतीय रेल्वेने एका नव्या ‘सुपरअॅप’चा प्रारंभ केला आहे. ते ‘रेलवन’ या नावाने ओळखले जात आहे. या अॅपमुळे रेल्वेच्या तिकिटांचे बुकिंग करणे आणि रिझर्व्हेशन करणे अधिक सुलभ आणि सोपे होणार आहे, असे रेल्वेचे म्हणणे आहे. या अॅममुळे एकाच क्लिकवर आपल्याला रेल्वे तिकिटे, रिझर्व्हेशन तसेच भारतीय रेल्वेसंबंधाने सर्व माहिती उपलब्ध होणार आहे, अशी माहिती देण्यात आली आहे. 1 जुलैपासून रेल्वेने प्रवाशांच्या सोयींसाठी अनेक सुविधा उपलब्ध केल्या आहेत.
या अॅपवर आपल्याला प्रवासी सेवा, अनरिझर्व्हड् तिकिटे, प्लॅटफॉर्म तिकिटे, रेल्वेचे स्टेटस, डब्यांमधील आसनांसंबंधी किंवा बर्थसंबंधी माहिती, प्रवासाचा फिडबॅक, प्रवासी साहाय्यता आणि इतर आवश्यक अशी सर्व माहिती मिळणार आहे. आतापर्यंत अनेक अॅप्सवरुन ही माहिती शोधावी लागली होती. यापुढे ती या एकाच अॅपवर मिळणार असल्याने प्रवाशांची मोठी सोय होणार आहे.
रिझर्व्हेशन व्यवस्थेत व्यापक परिवर्तन
सध्याच्या रिझर्व्हेशन यंत्रणेत व्यापक परिवर्तन करण्यासाठी रेल्वेने अनेक पावले उचलली आहेत. प्रवाशांची अधिकाधिक सोय व्हावी, म्हणून तीन महत्वाच्या परिवर्तनांना रेल्वेने प्राधान्य दिले आहे. सुधारित ‘तत्काल’ बुकिंग व्यवस्था, प्रतीक्षासूची कोष्टक बनविण्याची पद्धती आणि रिझर्व्हेशन सोयीचे अत्याधुनिकीकरण ही ती तीन महत्वाची परिवर्तने आहेत. प्रतीक्षासूची कोष्टक (वेटिंग लिस्ट चार्ट) किमान आठ तास आधी सज्ज करण्याला महत्व देण्यात येत आहे. प्रचलित पद्धतीनुसार हे कोष्टक प्रवासाच्या आधी चार तास बनविण्यात येते. यामुळे प्रवाशांना शेवटच्या क्षणापर्यंत आपले तिकिट आणि रिझर्व्हेशन निश्चित आहे की नाही हे समजत नाही. परिणामी त्यांना ऐनवेळी धावपळ करावी लागते. आता हा कालावधी 8 तासांचा करण्यात आल्याने प्रवाशांना आपले रिझर्व्हेशन निश्चित आहे की नाही, हे आठ तास आधी या नव्या अॅपवर समजणार आहे. त्यामुळे त्यांना पुढच्या योजना करणे सुलभ होणार आहे. तत्काल बुकिंगमध्ये होणारे घोटाळे थांबविण्यासाठी या सुविधेला ओटीपीची जोड देण्यात आलेली आहे. तत्काल बुकिंग करण्यासाठी यापुढे ओटीपी द्यावा लागणार आहे. ओटीपी प्राप्त करण्यासाठी आधार क्रमांक द्यावा लागणार आहे. हे परिवर्तन 1 जुलैपासून लागू करण्यात आले आहे.
सेवा वेगवान होणार
रेल्वे सेवा प्रक्रियांचे अत्याधुनिकीकरण केले जाणार आहे. रिझर्व्हेशन प्रक्रियेचा वेग सध्याच्या 10 पट वाढविण्यात येत आहे. त्यामुळे एका मिनिटात 1 लाख 50 हजार रिझर्व्हेशनांची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. रेल्वे रिझर्व्हेशन चौकशीसंबंधीच प्रक्रियाही वेगवान केली जात आहे. एका मिनिटात 40 लाख चौकशांची हाताळणी पूर्ण होणार आहे. विविध भारतीय भाषांमधून होणाऱ्या चौकश्यांची हाताळणीही वेगाने केली जाणार आहे. दिव्यांगजन, विद्यार्थी आणि रुग्ण आदी समाजघटकांना वेगवान सेवा पुरविली जाईल. रेल्वेप्रवासासंबंधी सर्व माहिती प्रवाशांना विनासायास घरबसल्या उपलब्ध होईल, अशी ही व्यवस्था आहे.
‘रेलवन’ अॅप काय काय करणार...
ड रेल्वे प्रवाशांना वेगवान आणि अचूक सेवा देण्यासाठी या अॅपची निर्मिती
ड रेल्वेसेवांची माहिती घेण्यासाठी अनेक अॅप्स धुंडाळण्याची आवश्यकता नाही
ड हे अॅप अँड्रॉईड पेस्टोअर आणि आयओएस अॅप स्टोअरवर आहे उपलब्ध
ड ‘सिंगल साईन इन’मुळे अनेक पासवर्ड लक्षात ठेवण्याची आवश्यकता नाही
ड सध्याच्या ‘रेलकनेक्ट’ किंवा युटीसनमोबाईलचा उपयोग करुन नोंदीची सोय
ड उपयोगकर्त्यांना त्यांच्या खात्यांशी संपर्कासाठी साधा न्यूमरिक एमपिन पुरे
ड रेल्वे प्रवाशांसाठी आर-वॅलेट किंवा रेल्वे ई वॅलेट फंक्शनॅलिटी सोय उपलब्ध