प्रशासनाला जाग आणण्यासाठी रेल्वे संघटनेचे 27 रोजी गांधीगिरी आंदोलन
सावंतवाडी | प्रतिनिधी
सावंतवाडी रेल्वे टर्मिनसच्या भूमिपूजनाला येत्या 27 जून रोजी 10 वर्षे पूर्ण होत आहेत. भूमिपूजन झाले तरी अद्याप टर्मिनस पूर्णत्वास आले नसल्याने याची जाग प्रशासनाला आणून देण्यासाठी कोकण रेल्वे प्रवासी संघटने कडून 27 जून 2025 रोजी सावंतवाडी रेल्वे स्थानकावर सकाळी 11 वाजता टर्मिनसचा वाढदिवस साजरा करीत साखर वाटून गांधीगिरी आंदोलन छेडण्यात येणार आहे. अशी माहिती सावंतवाडी रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष ॲड .संदीप निंबाळकर यांनी येथे दिली. सावंतवाडी येथील श्रीराम वाचन मंदिरात आज कोकण रेल्वे प्रवासी संघटनेची बैठक श्री निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, व्यापारी संघाचे जगदीश मांजरेकर, सचिव मिहीर मठकर, सुभाष शिरसाट, अभिमन्यू लोंढे, हरिश्चंद्र पवार, विजया पेडणेकर, विनायक राऊळ, नारायण मसूरकर, रवी साटवेलकर तेजस कुंभार, चंद्रशेखर मांजरेकर, आदित्य मांजरेकर, तेजस पोयेकर आदींसह मान्यवर उपस्थित होते.सावंतवाडी टर्मिनसचे भूमिपूजन २७ जून २०१५ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू, तत्कालीन पालकमंत्री आमदार दीपक केसरकर, तत्कालीन खासदार विनायक राऊत आणि इतर लोकप्रतिनिधी व रेल्वे अधिकारी यांच्या उपस्थितीत होते. यानंतर पहिल्या टप्प्याचे काम झाले, मात्र दुसऱ्या टप्प्याचे काम अजूनही झालेले नाही. परिणामी, हे महत्त्वाकांक्षी टर्मिनस आजही धूळ खात पडले आहे.रेल्वे प्रवासी संघटनेने या टर्मिनसच्या पूर्णत्वासाठी वेळोवेळी आंदोलने केली आहेत. मात्र, प्रवाशांची गैरसोय होत असूनही लोकप्रतिनिधी यावर गप्प बसल्याची खंत बैठकीत व्यक्त करण्यात आली. लवकरच सावंतवाडी शहर आणि परिसरातील व्यापारी व व्यावसायिकांची पुन्हा बैठक घेऊन आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यावर चर्चा झाली. भूमिपूजनाला १० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने, २७ जून रोजी सकाळी ११ वाजता सावंतवाडी रेल्वे स्थानकावर एकत्र येऊन 'टर्मिनसचा वाढदिवस' साजरा करण्यात येणार आहे. यावेळी साखर वाटून प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी गांधीगिरी आंदोलन छेडण्याचा इशारा संघटनेने दिला आहे.