अनगोळ येथील रोड अंडरब्रिजच्या कामाचे भूमिपूजन
26.05 कोटी निधीची तरतूद : 2026 पर्यंत बांधकाम पूर्ण होणार
बेळगाव : अनगोळ चौथे रेल्वेगेट येथे रोड अंडरब्रिजच्या कामाचा सोमवारी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री व्ही. सोमण्णा यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. 26.05 कोटी रुपये खर्च करून प्रशस्त असा अंडरब्रिज बांधला जाणार असल्याची माहिती रेल्वेमंत्र्यांनी दिली. यामुळे बेळगाव शहर व अनगोळचा संपर्क वाढविणे भविष्यात अधिक सुलभ होणार आहे. रेल्वेमंत्री व्ही. सोमण्णा यांच्यासोबत खासदार जगदीश शेट्टर, राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. खानापूर येथील स्टेशन यार्ड येथे रोड अंडरब्रिज, प्लॅटफॉर्म शेल्टर, वेटिंग रूम, टॉयलेट यासारख्या सुविधांसाठी 11 कोटी रुपये दिले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कंत्राटदार, अधिकाऱ्यांना बांधकामाचा दर्जा राखण्याची सूचना केली. याबरोबरच त्यांनी आळणावर व लोंढा या रेल्वेस्थानकांचीही पाहणी केली.
रेल्वेमंत्र्यांना करावा लागला वाहतूक कोंडीचा सामना
टिळकवाडी येथील दुसरे रेल्वेगेट उड्डाणपुलाचे काम रखडले जात आहे. काही नागरिकांनी विरोध दर्शविल्यामुळे हे काम थांबले होते. परंतु, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री बेळगावमध्ये येणार असल्यामुळे रविवारी या परिसरात कंत्राटदाराकडून आरेखन करण्यात आले होते. त्याचबरोबर आसपासच्या परिसराचीही स्वच्छता करण्यात आली. सोमवारी सकाळपर्यंत केंद्रीय मंत्री दुसरे रेल्वेगेट येथे येतील, असे सांगण्यात येत होते. परंतु, दिवसभरात ते या ठिकाणी फिरकले नसल्याचे दिसून आले. रात्री खानापूरहून परतताना रेल्वेमंत्र्यांना दुसरे रेल्वेगेट येथील वाहतूक कोंडीचादेखील सामना करावा लागला.