अखेर रेल्वेचे वेळापत्रक रुळावर
वंदेभारत मध्यरात्री 3 वाजता बेळगावात दाखल
► त. भा. प्रतिनिधी
बेळगाव
बेळगाव-धारवाड रेल्वेमार्गावरील लोंढा येथे यार्डचे काम करण्यात आल्याने मंगळवारी दिवसभर रेल्वे तीन ते चार तास उशिराने धावत होत्या. रात्री 10.30 वाजता येणारी वंदे भारत एक्स्प्रेसही मध्यरात्री 3 वाजता बेळगावला दाखल झाली. परंतु बुधवारी सकाळपासून रेल्वेचे वेळापत्रक पूर्वपदावर आल्याने सर्व एक्स्पे्रस वेळेवर धावत होत्या.
लोंढा यार्डमध्ये नॉन इंटरलॉकिंगचे काम सुरू असल्याने धारवाडहून बेळगावला येणाऱ्या एक्स्प्रेस मंगळवारी उशिराने धावत होत्या. सकाळी बेळगावहून बेंगळूरच्या दिशेने जाणारी वंदे भारत उशिराने पोहोचल्याने परतीच्या प्रवासातही एक्स्प्रेसला विलंब झाला. धारवाडपर्यंत वेळेत पोहोचलेली वंदे भारत त्यानंतर मात्र धिम्यागतीने लोंढा व तेथून बेळगावला आली.
वेगवान वंदे भारत रात्री 3 वाजता बेळगावमध्ये दाखल झाल्याने प्रवाशांनी संताप व्यक्त केला. बुधवारी सकाळपासून मात्र सर्व एक्स्प्रेस वेळेनुसार धावत होत्या. काही किरकोळ विलंब सोडता वेळापत्रक पूर्वपदावर आल्याने प्रवाशांनी समाधान व्यक्त केले. परंतु मंगळवारी दिवसभर झालेल्या मनस्तापाने प्रवाशांचे पुरते नाकेनऊ आले.