रेल्वे तिकीट अॅडव्हान्स बुकिंग आता केवळ 2 महिने अगोदर
1 नोव्हेंबरपासून नवीन नियम लागू होणार : यापूर्वी 4 महिने अगोदर तिकीट आरक्षणाची सुविधा
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
भारतीय रेल्वेने आगाऊ (अॅडव्हान्स) तिकीट बुकिंगचे नियम बदलले आहेत. पूर्वी तिकीट बुकिंग प्रवासाच्या 120 दिवस आधी सुरू केले जात होते. मात्र, आता ते 60 दिवसांवर आणण्यात आले आहे. नवीन निर्णय 1 नोव्हेंबर 2024 पासून लागू होणार आहे. तथापि, आगाऊ रेल्वे तिकीट बुकिंगच्या नवीन नियमांचा यापूर्वी काढण्यात आलेल्या तिकिटांवर कोणताही परिणाम होणार नाही. सध्या, आयआरसीटीसी वेबसाईट, अॅप आणि रेल्वे बुकिंग काउंटरद्वारे तिकीट बुकिंग केले जाते. साधारणपणे दररोज 12.38 लाख तिकिटे आयआरसीटीसीद्वारे बुक केली जातात.
नवीन नियमावलीबाबत रेल्वे बोर्डाकडून एक परिपत्रक काढण्यात आले आहे. त्यात 31 ऑक्टोबरपर्यंत केलेले सर्व बुकिंग कायम राहतील, असेही नमूद करण्यात आले आहे. तसेच परिपत्रकात ‘एआरपी’ कमी करण्याचे कोणतेही कारण नमूद केलेले नाही. बोर्डाच्या परिपत्रकात सध्या आगाऊ आरक्षणासाठी कमी वेळ मर्यादा लागू असलेल्या ताज एक्स्प्रेस, गोमती एक्स्प्रेस इत्यादीसारख्या विशिष्ट दिवसाच्या एक्स्प्रेस गाड्यांच्या बाबतीत कोणताही बदल होणार नाही असेही स्पष्ट करण्यात आले आहे. त्याव्यतिरिक्त परदेशी पर्यटकांसाठी 365 दिवसांच्या मर्यादेतही कोणताही बदल होणार नाही, असे त्यात म्हटले आहे.
रेल्वेने 2015 मध्ये आगाऊ आरक्षणाचा कालावधी वाढवला होता. 1 एप्रिल 2015 पर्यंत आगाऊ आरक्षण कालावधी 60 दिवसांचा होता. त्यापूर्वी 25 मार्च 2015 रोजी रेल्वे मंत्रालयाने एआरपी 60 दिवसांवरून 120 दिवसांपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला होता. आगाऊ आरक्षण कालावधी कमी केल्यामुळे व्याज आणि रद्दीकरणातून ‘आयआरसीटीसी’ची कमाई कमी होईल. त्याचा परिणाम त्याच्या उत्पन्नावरही दिसून येईल. सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे कंपनीचे शेअर्स सुमारे 2.5 टक्क्यांनी कमी होऊन 870 ऊपयांवर बंद झाले. एका महिन्यात स्टॉक 6 टक्क्यांनी घसरला आहे. कंपनीचे मार्केट पॅप सुमारे 70 हजार कोटी ऊपये आहे.