रेल्वेस्थानकाचा ‘विक्रम’
भारतात रेल्वे हे प्रवासाचे सर्वात लोकप्रिय आणि तुलनेने स्वस्त असे साधन आहे. प्रतिदिन कोट्यावधी लोक देशात सर्वत्र रेल्वेने प्रवास करतात. मुंबईसारख्या शहरात तर लोकल रेल्वे ही नोकरदारांची जीवनदायीनी मानली जाते. लोकलशिवाय मुंबईकरांना जीवन असह्या होईल अशी परिस्थिती आहे. रेल्वेची सिग्नल व्यवस्था आणि रीले इंटरलॉकिंग व्यवस्था जगातील सर्वात सक्षम मानली जाते.
दिल्ली रेल्वे स्थानक त्याच्या प्रवासी नियंत्रण आणि रीले इंटरलॉकिंग व्यवस्थेविषयी जगात प्रसिद्ध आहे. या स्थानकावर 11 हजारांहून अधिक रीले असून या रीलेच्या माध्यमातून 1,122 सिग्नल मुव्हमेंटस् सांभाळल्या जातात. या व्यवस्थेतून हे सुनिश्चित केले जाते, की कोणतीही गाडी चुकीच्या ट्रॅकवर जाऊ नये. दिल्लीच्या रेल्वे स्थानकाचा हा विक्रम गिनीज विक्रम पुस्तिकेत नुकताच नोंद झाला आहे. 70 वर्षांपूर्वी दिल्लीचे मुख्य रेल्वे स्थानक जुन्या दिल्लीत होते. तेथे जागा कमी पडू लागल्याने त्याचे स्थानांतर 1956 मध्ये करण्यात आले. हे नवे स्थानक दिल्ली रेल्वे स्थानक या नावाने ओळखले जाऊ लागले. 2010 मध्ये या स्थानकाच्या फलाटांची संख्या 16 करण्यात आली. या रेल्वे स्थानकाच्या नावावर आणखी एक विक्रम नोंदला गेला आहे. येथे प्रतिदिन 5 लाख प्रवासी ये जा करतात. तसेच 250 हून अधिक रेल्वे गाड्यांची आवक जावक होते. इतक्या गाड्या जगातील कोणत्याही रेल्वे स्थानकावर एका दिवसात येत नाहीत. त्यामुळे या स्थानकाने आपली रीले यंत्रणा, गाड्यांची प्रतिदिन संख्या आणि प्रवाशांची प्रतिदिन संख्या या तीन्ही क्षेत्रांमध्ये जागतिक विक्रम केला आहे. असे तीन विक्रम एक स्थानकाच्या नावे असणे, हा ही एक विक्रमांचा विक्रम आहे.