आरपीएफ नियंत्रण केंद्राद्वारे रेल्वेस्थानकांवर नजर
महाव्यवस्थापकांच्या हस्ते उद्घाटन : बेळगावसह 78 रेल्वेस्थानकांवर यंत्रणा
प्रतिनिधी/ बेळगाव
बेळगावसह हुबळी विभागातील सर्वच रेल्वेस्थानकांवर देखरेख करणाऱ्या आरपीएफच्या (रेल्वे संरक्षण दल) नियंत्रण केंद्राचे उद्घाटन शनिवारी नैर्त्रुत्य रेल्वेचे महाव्यवस्थापक मुकुल सरन माथूर यांच्या हस्ते झाले. हुबळी येथे सुरू करण्यात आलेल्या या नव्या नियंत्रण केंद्रामुळे सर्व रेल्वेस्थानकांवरील सीसीटीव्हींवर रेल्वे पोलिसांना लक्ष ठेवता येणार आहे.
रेल्वेचे जलद आणि सुरक्षित कामकाज होण्यासाठी नैर्त्रुत्य रेल्वेकडून तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. यामध्ये आरपीएफ नियंत्रण केंद्र महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. एकाच ठिकाणाहून सर्व रेल्वेस्थानकांवर लक्ष ठेवणे व सुरक्षा यंत्रणेत सुधारणा करणे सोयीस्कर होणार असल्याचे त्यांनी सांगितले. हुबळी विभागीय व्यवस्थापक बेला मीना यांनी नैर्त्रुत्य रेल्वेच्या सुधारित कामकाजाबद्दल कौतुक केले.
हुबळी येथील विभागीय आरपीएफ सुरक्षा नियंत्रण कक्ष हा आधुनिक सीसीटीव्ही कमांड अॅण्ड कंट्रोल सेंटर तयार करण्यात आला आहे. यामध्ये बेळगाव, हुबळीसह 78 रेल्वेस्थानकांवर सक्षमपणे लक्ष ठेवले जाणार आहे. सर्व रेल्वेस्थानकांमध्ये 943 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे सर्व्हिलन्स फुटेज कॅप्चर व रेकॉर्ड केले जाणार आहे. रेलटेल
कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडच्या समन्वयाने ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली असल्याचे अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक टी. बी. भूषण यांनी सांगितले.