रेल्वेमार्गावर कर्मचाऱ्यांचाच खेळ
रेल्वेमार्गांची सुरक्षा करण्याचे काम प्रामुख्याने रेल्वे कर्मचाऱ्यांचे आहे. त्याचप्रमाणे सर्वसामान्य नागरीकांसाठीही रेल्वेचे अनेक नियम असतात. रेल्वे येत नाही आहे, याची पूर्ण दक्षता घेऊनच मार्ग ओलांडणे, रेल्वेमार्गांवरुन कोणत्याही कारणास्तव किंवा कोणत्याही परिस्थितीत न चालणे, रेल्वेरुळांवर कोणतीही वस्तू न ठेवणे इत्यादी बंधने सर्वांवर असतात. ती सर्वसामान्यांच्या सुरक्षेसाठीच असतात. एकंदर, रेल्वे हे प्रकरण सर्वचजण जबाबदारीने हाताळतील अशी प्रशासनाची अपेक्षा असते.
तथापि, रेल्वेकर्मचाऱ्यांनीच नियमांचे पालन केले नाही, तर सर्वसामान्यांकडून कोणती अपेक्षा ठेवणार ? सध्या एक व्हिडीओ प्रदर्शित होत आहे. दिल्ली-हावडा मार्गावरच्या रुळांच्या मधोमध बसून रेल्वेच्याच काही महिला कर्मचारी मोबाईलवर ल्यूडोचा खेळ खेळत असल्याचे या व्हिडीओत दिसून येते. विशेष म्हणजे हा प्रकार त्यांच्या सेवेच्या तासांमध्येच होत असताना दिसतो. या महिलांवर रेल्वेमार्गावर देखरेख ठेवण्याचे काम सोपविण्यात आलेले असताना त्या स्वत:च चक्क रुळांवर बसून मोबाईलवर खेळ खेळण्यात मग्न आहेत, असे दिसून येते. हे दृष्य या रेल्वेमार्गावरील इटावा स्थानकाच्या नजीकचे आहे. रुळांवर आपण का बसलेल्या आहात असे या महिलांना विचारण्यात आले, तेव्हा त्यांनी रुळांची देखरेख करण्याचे आमचे काम आहे, असे उत्तर दिल्याचे व्हिडीओत दिसून येते.
सध्या रेल्वेमार्गांवर स्फोटके, गॅस सिलिंडर आदी धोकादायक वस्तू ठेवल्या जाण्याचे बरेच प्रकार आढळले आहेत. हा एका व्यापक कटकारस्थानाचा भाग असल्याचेही स्पष्ट होत आहे. अशावेळी रेल्वे कर्मचाऱ्यांची जबाबदारी अधिकच वाढते. त्यामुळे या व्हिडीओवर सर्वसामान्यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.