रेल्वे अर्थसंकल्प बेळगावकरांसाठी निरस
एकाही प्रकल्पासाठी भरीव तरतूद नाही : नवीन रेल्वेमार्ग करण्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष
बेळगाव : केंद्रीय रेल्वे अर्थसंकल्पात बेळगावकरांच्या पदरी निराशा पडली आहे. बेळगाव-धारवाड व्हाया कित्तूर या रेल्वे प्रकल्पासाठी केवळ 8 कोटी 51 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त पुणे-लोंढा दुहेरी मार्ग व बागलकोट-कुडची रेल्वेमार्ग यासाठी तरतूद असून नवीन रेल्वेमार्ग करण्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शनिवारी अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात रेल्वे अर्थसंकल्पही मांडण्यात आला. बेळगाव-धारवाड व्हाया कित्तूर हा रेल्वेमार्ग मागील आठ ते दहा वर्षांपासून प्रलंबित आहे.
माजी केंद्रीय रेल्वेराज्यमंत्री कै. सुरेश अंगडी यांच्या प्रयत्नातून या रेल्वेमार्गाला गती देण्यात आली. परंतु, त्यानंतर या रेल्वेमार्गाचे काम पूर्णत: रखडले. अद्याप या रेल्वेमार्गासाठी भूसंपादन पूर्ण झालेले नाही. धारवाड जिल्ह्यात भूसंपादन झाले असले तरी बेळगाव जिल्ह्यात अद्याप भूसंपादन केलेले नाही. बेळगाव-धारवाड रेल्वेमार्गाच्या कामाला गती न मिळाल्याने यावर्षीच्या अर्थसंकल्पात केवळ 8 कोटी रुपयांच्याच निधीची तरतूद करण्यात आली आहे. याबरोबरच पुणे-मिरज-लोंढा रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणासाठी 312 कोटी रुपये तर बागलकोट-कुडची या नव्या रेल्वेमार्गासाठी 428 कोटी रुपये तरतूद करण्यात आली आहे. कर्नाटकासाठी या अर्थसंकल्पात 7 हजार 564 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याची माहिती केंद्रीय रेल्वेराज्यमंत्री व्ही. सोमण्णा यांनी दिली आहे.
बेळगावसह कोकणातील नागरिकांच्या पदरी निराशाच
बेळगाव-सावंतवाडी व बेळगाव-कोल्हापूर अशा दोन नवीन रेल्वेमार्गांची मागणी प्रवासीवर्गातून होत आहे. बेळगाव-कोल्हापूर रेल्वेमार्गासाठी सर्वेक्षणदेखील केले जात आहे. त्यामुळे या रेल्वेमार्गासाठी निधीची तरतूद होईल, असा बेळगावच्या नागरिकांना विश्वास होता. परंतु, अर्थसंकल्पात बेळगाव-सावंतवाडी व बेळगाव-कोल्हापूर या रेल्वेमार्गासाठी कोणत्याही निधीची तरतूद नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे बेळगावसह कोकणातील नागरिकांच्या पदरी निराशाच आली आहे.