मळगाव घाटीत रेलिंग तुटले ;वाहनधारकांना धोका
न्हावेली / वार्ताहर
सावंतवाडी - रेडी मार्गावरील मळगाव घाटीत रविवारी मोठे झाड कोसळले.हे झाड दरीच्या लगत उभारण्यात आलेल्या रेलिंगवर कोसळल्याने रेलिंग तुटले रस्त्यालगत धोकादायक रित्या असलेली झाडे हटविण्याच्या प्रयत्नात हे झाड रेलिंगवर कोसळले वनविभाग कडून ही धोकादायक झाडे हटविण्याची मोहीम राबविण्यात आली होती.या तुटलेल्या रेलिंगमुळे वाहनधारकांना धोका निर्माण झाला असून सार्वजनिक बांधकाम विभागाने या ठिकाणी तात्काळ नवीन रेलिंग बसवावे अशी मागणी वाहनधारकांमधून होत आहे.
मळगाव घाटीत अनेक ठिकाणी रेलिंग तुटले आहे.तर संरक्षक काड्याचा भागही अनेक ठिकाणी कोसळला आहे त्यातच रविवारी डोंगराच्या दिशेने असलेले भले मोठे झाड तोडत असताना ते रस्त्यावर कोसळले.हे झाड कोसळल्यामुळे आधीच मोडकळीस आलेले रेलिंग पुर्णपणे निखळून खाली पडले.त्यामुळे येथील दरीचा भाग मोकळा झाल्याने याठिकाणी वाहन दरीत कोसळण्याची भीती निर्माण झाली आहे.सार्वजनिक बांधकाम विभागाने या गोष्टीची तात्काळ दखल घेऊन येथील रेलिंग नव्याने उभारावे तसेच अन्य ठिकाणी तुटलेल्या रेलिंगचीही दुरुस्ती करावी अशी मागणी होत आहे.याबाबत माजी सभापती राजू परब यांनी काही दिवसांपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाचे लक्ष वेधले होते मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले असून बांधकाम विभाग अपघाताची वाट पाहत आहे का असा सवाल राजू परब यांनी उपस्थित केला आहे.दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्पुरती दक्षता म्हणून याठिकाणी दगड रचून ठेवले आहेत तसेच तुटलेले पाईप अडकवून ठेवले आहेत मात्र दगड लावून ठेवलेल्या भागातील रस्ता खचण्यास सुरुवात झाली असून मोठ्या पावसात त्याठिकाणी रस्ता पूर्णपणे खचून धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे याठिकाणी तात्पुरती डागडुजी न करता कायमस्वरुपी उपाययोजना करण्यात यावी अशी मागणी होत आहे.दरम्यान , दोन वर्षांपूर्वी या मार्गावरील ब्रिटिशकालीन मोरी कोसळल्यामुळे हा मार्ग ऐन पावसळ्यात तब्बल महिनाभर बंद होता.त्यामुळे वाहन चालकांना इन्सुली तसेच आकेरी मार्गे सावंतवाडी गाठावी लागत होती ती परिस्थिती लक्षात घेता ती वेळ उध्दवण्यापूर्वीच सार्वजनिक बांधकाम विभागाने याठिकाणी वेळीच पाऊल उचलणे गरजेचे आहे.