For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

रेल्वे-विमानसेवा सुसाट...

06:25 AM Jun 21, 2026 IST | Tarun Bharat Portal
रेल्वे विमानसेवा सुसाट
Advertisement

रेल्वे मंत्रालयाने भारतीय रेल्वे नेटवर्कला जगातील सर्वात आधुनिक आणि वेगवान वाहतूक प्रणालीमध्ये रुपांतरित करण्यासाठी एक अभूतपूर्व आराखडा तयार केला आहे. केंद्र सरकारने प्रमुख शहरे आणि दुर्गम भागांमधील अंतर कमी करण्यासाठी 16 लाख कोटी खर्चाने सात नवीन समर्पित हाय-स्पीड बुलेट ट्रेन कॉरिडॉर विकसित करण्याची योजना आखली आहे. या महाप्रकल्पाचे सर्वात मोठे वैशिष्ट्या म्हणजे एकदा पूर्ण झाल्यावर दिल्ली आणि सिलिगुडी (पश्चिम बंगाल) दरम्यानचा 1,500 किलोमीटरचा प्रवास केवळ सहा तासात पूर्ण होणार आहे. सध्या या प्रवासाला 20 तासांपेक्षा जास्त वेळ लागतो. एकीकडे ही रेल्वे नेटवर्क सुधारण्याची हायस्पीड कार्यपद्धती सुरू असतानाच देशातील विमानसेवेमध्ये मोठ्या सुधारणा केल्यामुळे देशातील विमानतळे जागतिक पातळीवर चमकत असल्याचेही स्पष्ट झाले आहे.

Advertisement

- जयनारायण गवस.

► तब्बल 20 तासांचा प्रवास केवळ सहा तासात होणार पूर्ण

Advertisement

► देशात 7 नवीन हाय-स्पीड कॉरिडॉर निर्मितीची प्रक्रिया सुरू

► 16 लाख कोटींच्या बजेटमधून रेल्वे नेटवर्कमध्ये परिवर्तन

► वेगवान, सुरक्षित आणि आरामदायक प्रवासावर अधिक भर

भारतीय रेल्वे देशातील प्रमुख शहरांना जोडण्यासाठी आणि लांब पल्ल्याच्याप्रवासात परिवर्तन घडविण्यासाठी 16 लाख कोटी रुपयांच्या हाय-स्पीड नेटवर्कची योजना आखत आहे. तथापि, याची कालमर्यादा अद्याप निश्चित झालेली नाही. देशाच्या राजधानीत राहणाऱ्या कोणत्याही प्रवाशाला अगदी पूर्वेकडील राज्य पश्चिम बंगालमधील सिलीगुडी या शहरात 1500 किलोमीटरचा प्रवास लवकर करावा लागतो. रेल्वेने गेल्यास या प्रवासाला 20 तासांचा अवधी लागतो. या प्रवासात बराच वेळ जात असल्यामुळे लोक विमानसेवेला प्राधान्य देतात. श्रीमंत लोकांना विमानाने जाणे शक्य असले, तरी गोरगरिबांना मात्र रेल्वेलाच प्राधान्यक्रम द्यावा लागतो. त्यामुळे हा प्रवासाचा वेळ कमी करण्यासाठी सरकारने रेल्वेमार्ग प्रणालीत मोठी सुधारणा करण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना करण्यासाठी ‘हायस्पीड’ काम सुरू केले आहे. नजीकच्या काही वर्षांमध्ये सरकारच्या या योजना पूर्णत्वास आल्यानंतर दिल्ली-सिलिगुडी हा वेळ हवाई प्रवासाच्या एकूण वेळेपेक्षा (फ्लाईट बुकिंग, सुरक्षा तपासणी, बोर्डिंग आणि सामान गोळा करणे यासह) कमी किंवा तितकाच असेल, असे मानले जात आहे. अर्थातच रेल्वे विभागातील सुधारणांमुळे प्रवासाची पद्धत बदलेल, तीही खूप कमी खर्चात आणि कदाचित अधिक आरामदायी प्रवासासह. जर ही मोहीम पूर्ण झाली तर तर भारताच्या प्रवासाच्या पद्धतीत मोठे परिवर्तन घडू शकते, अशी हमी रेल्वे मंत्रालय देत आहे.

केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी कोलकाता येथे प्रकल्पांचा आढावा घेताना देशातील काही निवडक मार्गांवर आणि महत्वाच्या शहरांमधील रेल्वे नेटवर्कमध्ये अभूतपूर्व बदल करण्यात येत असल्याचे संकेत दिले. अंदाजे 16 लाख कोटी रुपये खर्चाने सात समर्पित हाय-स्पीड रेल्वे नेटवर्क प्रस्तावित असल्याचे ते म्हणाले. दिल्ली-वाराणसी आणि वाराणसी-सिलिगुडी बुलेट ट्रेन कॉरिडॉरमुळे दिल्ली आणि सिलिगुडी दरम्यानचा प्रवासाचा वेळ केवळ सहा तासांपर्यंत कमी होईल. ही बुलेट ट्रेन नवी दिल्लीहून सुरू होऊन लखनौ, वाराणसी आणि पाटणामार्गे उत्तर बंगालमधील सिलिगुडीला पोहोचेल. सध्या दिब्रुगड राजधानी एक्स्प्रेसने या प्रवासाला 20 तासांपेक्षा जास्त वेळ लागतो.

दिल्ली-वाराणसी कॉरिडॉरच्या ‘डीपीआर’ची चाचपणी केली जात असताना वाराणसी-सिलिगुडी कॉरिडॉरच्या डीपीआरवर येत्या काही महिन्यांत काम सुरू होण्याची शक्यता आहे. अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेन प्रकल्पासह हे नवीन कॉरिडॉर पश्चिम, दक्षिण, उत्तर आणि पूर्व भारताला हाय-स्पीड रेल्वे कनेक्टिव्हिटी प्रदान करतील. प्रवासी दिल्ली ते सिलिगुडी बुलेट ट्रेनच्या वेगाने प्रवास करू शकतील, त्याचप्रमाणे ते अहमदाबाद, मुंबई, पुणे, हैदराबाद, बेंगळूर आणि चेन्नई यांना जोडणाऱ्या हाय-स्पीड रेल्वे सेवांचाही वापर करू शकतील.

पहिली स्वदेशी बुलेट ट्रेन ऑगस्ट 2027 मध्ये धावणार

भारत आता केवळ परदेशी तंत्रज्ञानावर अवलंबून नाही, तर आयातीवरील अवलंबित्व दूर करण्यासाठी देशांतर्गत हाय-स्पीड इकोसिस्टमचे मानकीकरण करत आहे. या माध्यमातून आयातीवरील अवलंबित्व कमी करण्याचा विचार आहे. रेल्वेसाठी सार्वजनिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या ‘बीईएमएल’ कंपनीकडून भारताची पहिली पूर्णपणे स्वदेशी बुलेट ट्रेन बनविली जात आहे. ही स्वदेशी बुलेट ट्रेन अहमदाबाद-मुंबई कॉरिडॉरच्या सूरत ते बिलिमोरा या 100 किमीच्या पट्ट्यावर ऑगस्ट 2027 मध्ये पहिल्यांदा व्यावसायिकरित्या चालवण्याची तयारी सुरू आहे. या स्वदेशी ट्रेनचा वेग सुरुवातीला ताशी 280 किलोमीटरपर्यंत असणार आहे. नंतर त्यात आणखी सुधारणा करून ताशी 350 किलोमीटरपर्यंत वाढवला जाऊ शकतो.

प्रस्तावित 7 हायस्पीड कॉरिडॉर

दिल्ली-वाराणसी                   945 किमी

वाराणसी-सिलिगुडी           670 किमी

मुंबई-पुणे                        170 किमी

पुणे-हैदराबाद                   501 किमी

हैदराबाद-बेंगळूर              532 किमी

बेंगळूर-चेन्नई                  306 किमी

चेन्नई-हैदराबाद               728 किमी

 जागतिक पातळीवरील सुपरफास्ट रेल्वे सुविधा

बुलेट ट्रेनचे काम प्रगतीपथावर

भविष्यातील बुलेट ट्रेन प्रकल्प भारतीय तंत्रज्ञान आणि देशात तयार केलेल्या रोलिंग स्टॉकवर आधारित असणार आहे. प्रकल्पांची पूर्तता जलद करण्यासाठी आणि मोठ्या प्रमाणावरील कामाचे फायदे मिळवण्यासाठी भारतीय रेल्वे बांधकाम आणि सिग्नलिंगपासून ते ट्रेनच्या निर्मितीपर्यंत संपूर्ण परिसंस्थेचे मानकीकरण करत आहे. अहमदाबाद-मुंबई प्रकल्पाच्या बांधकामाचा वेग आता दरमहा सुमारे 15 किलोमीटरपर्यंत वाढला आहे. हे स्वदेशी अभियांत्रिकी आणि सर्वोत्तम तंत्रज्ञानाच्या अवलंबनामुळे गतिमान झाले असून ही प्रगती या क्षेत्रातील वाढत्या कौशल्याचे द्योतक मानले जात आहे. देशांतर्गत उत्पादनाला चालना देण्यासाठी आणि आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी भारत भविष्यातील कॉरिडॉरसाठी बुलेट ट्रेनच्या भागांचेही मानकीकरण करत आहे.

प. बंगालमधील रेल्वे नेटवर्कमध्ये मोठे परिवर्तन 

केंद्र सरकार बंगालसाठी रेल्वे प्रकल्पांचा मास्टर प्लॅन तयार करत आहे.

सिलिगुडी आणि दिल्लीदरम्यान बुलेट ट्रेन सेवा देण्याचा विचार सुरू असतानाच पश्चिम बंगालसाठी 61 रेल्वे प्रकल्पांना मंजुरी मिळाली आहे. रेल्वेमंत्र्यांनी बंगालमध्ये 538 नवीन उ•ाणपूल आणि भुयारी मार्गांच्या बांधकामाची घोषणा केली आहे. या प्रकल्पांमुळे बंगालमधील रेल्वे नेटवर्कमध्ये मोठे परिवर्तन होण्याची अपेक्षा आहे. येत्या काळात पश्चिम बंगालमध्ये 102 ‘अमृत भारत’ स्थानकेही विकसित केली जातील. याशिवाय कोलकाता मेट्रोला पाच वर्षांच्या आत 60 नवीन रेक्स (ट्रेनचे डबे) मिळतील. बंगालमधील डंकुनीला गुजरातमधील सुरतशी जोडण्यासाठी एका समर्पित पूर्व-पश्चिम मालवाहतूक कॉरिडॉरचीही घोषणा करण्यात आली आहे.

सुंदर विमानतळांमध्ये दोन भारतीय एअरपोर्ट

नवी मुंबई, गुवाहाटी विमानतळांनी मिळवले जागतिक यादीत स्थान

‘प्री-व्हर्साय 2026’ या आंतरराष्ट्रीय डिझाईन पुरस्काराने जगभरातील सात सर्वात सुंदर विमानतळांची यादी जाहीर केली आहे. या प्रतिष्ठित जागतिक यादीत  नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि गुवाहाटीचे लोकप्रिय गोपीनाथ बोरदोलोई आंतरराष्ट्रीय विमानतळ या दोन भारतीय विमानतळांनी स्थान मिळवून इतिहास रचला आहे. या यादीसाठी विमानतळांची निवड केवळ त्यांच्या बाह्य सौंदर्यावरच नव्हे, तर वास्तुकलेतील नावीन्य, प्रवाशांना मिळणारा उत्तम अनुभव, पर्यावरणाविषयीची जागरुकता आणि स्थानिक संस्कृतीचे प्रतिबिंब यांसारख्या कठोर निकषांवर आधारित होती. दोन्ही भारतीय विमानतळांनी आपली पारंपरिक सांस्कृतिक ओळख आधुनिक रचनेसोबत सुंदरपणे जोडली आहे. भारताव्यतिरिक्त या जागतिक यादीत जगभरातील इतर अनेक भव्य विमानतळांचा समावेश आहे. त्यामध्ये चीनमधील ग्वांगझो बाययुन आंतरराष्ट्रीय विमानतळ, जर्मनीमधील फ्रँकफर्ट विमानतळ, कंबोडियामधील ताकेओ आंतरराष्ट्रीय विमानतळ, अमेरिकेतील सॅन दिएगो आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि पिट्सबर्ग आंतरराष्ट्रीय विमानतळ यांना स्थान मिळाले आहे.

विमानतळांची वैशिष्ट्यापूर्णता...

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ : नवी मुंबई विमानतळाची वास्तुकला भारताचे राष्ट्रीय फूल, कमळ, सुंदरपणे प्रतिबिंबित करते. ही रचना भारतीय संस्कृती आणि आधुनिकतेचे एक अद्वितीय उदाहरण बनली आहे. तसेच प्रशस्त आणि हिरवीगार मोकळी जागा, मुबलक नैसर्गिक प्रकाश आणि जागतिक दर्जाच्या आधुनिक सुविधा ही या विमानतळाची सर्वात मोठी बलस्थाने ठरली आहेत.

गोपीनाथ बोरदोलोई विमानतळ, गुवाहाटी : गुवाहाटी विमानतळाचे नवीन टर्मिनल 2 हे ईशान्य भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे एक जिवंत प्रतीक आहे. या विमानतळाचे वैशिष्ट्या म्हणजे त्याच्या अंतर्गत सजावटीसाठी बांबूचा सर्जनशील वापर करण्यात आला आहे. स्थानिक कला, लोककथा आणि पारंपरिक आसामी हस्तकलेने जागतिक परीक्षकांना मोहित केल्यामुळे या विमानतळाला जगातील सर्वात सुंदर विमानतळांमध्ये स्थान मिळाले.

Advertisement
Tags :

.