For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

एफडीएच्या परवाना तपासणीने रायगडातील घरगुती खाणावळचालक चिंतेत

10:37 AM Aug 27, 2026 IST | Tarun Bharat Portal
एफडीएच्या परवाना तपासणीने रायगडातील घरगुती खाणावळचालक चिंतेत
Advertisement

अलिबाग : रायगडच्या पर्यटनाला समुद्रकिनारे, ऐतिहासिक किल्ले आणि निसर्गसौंदर्याची जोड लाभली असली तरी अस्सल कोकणी खाद्यसंस्कृती हे पर्यटकांचे प्रमुख आकर्षण ठरत आहे. घरगुती पद्धतीचे ताजे आणि पारंपरिक जेवण मिळत असल्याने पर्यटक स्थानिक खाणावळींना मोठी पसंती देतात. मात्र, अन्न व औषध प्रशासनाकडून (एफडीए) सुरू असलेल्या परवाना तपासणीमुळे अल्प भांडवलावर व्यवसाय करणाऱ्या घरगुती खाणावळचालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

Advertisement

अलिबाग, मुरूड, श्रीवर्धन, हरिहरेश्वर, काशीद, मांडवा आणि दिघी यांसह विविध पर्यटनस्थळांच्या परिसरात अनेक स्थानिकांनी घरातूनच खाणावळी सुरू केल्या आहेत. काही व्यवसाय वर्षभर सुरू असून, अनेक ठिकाणी निवास व न्याहारी केंद्रेही कार्यरत आहेत. पर्यटन हंगामात या व्यवसायातून अनेक कुटुंबांना अतिरिक्त उत्पन्न मिळते. विशेषतः महिलांसाठी रोजगार आणि आर्थिक स्वावलंबनाचे साधन म्हणूनही या खाणावळी महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.

मोठ्या हॉटेल्सच्या तुलनेत घरगुती खाणावळींमध्ये मिळणारी ताजी मासळी, स्थानिक पद्धतीने तयार केलेले पदार्थ आणि पारंपरिक कोकणी जेवण पर्यटकांना अधिक भावते. त्यामुळे या खाणावळी केवळ स्थानिकांचा छोटा व्यवसाय न राहता रायगडच्या पर्यटन व्यवस्थेचा अविभाज्य भाग बनल्या आहेत.

Advertisement

एफडीएकडून परवाना आणि नियमांची तपासणी होत असल्याने छोट्या व्यावसायिकांमध्ये कारवाईची भीती निर्माण झाली आहे. व्यवसाय सुरू ठेवताना आवश्यक नियमांचे पालन करण्याची तयारी असली तरी परवाना प्रक्रियेत सुलभता आणि छोट्या घरगुती व्यवसायांसाठी मार्गदर्शन मिळावे, अशी अपेक्षा खाणावळचालकांकडून व्यक्त होत आहे.

पर्यटन आणि स्थानिक रोजगाराला हातभार लावणाऱ्या या घरगुती खाणावळींना नियमांच्या चौकटीत आणताना त्यांच्यावर अनावश्यक आर्थिक किंवा प्रशासकीय भार पडू नये, अशी मागणी आता पुढे येत आहे.

Advertisement
Tags :

.