Konkan News: महाड MIDC तून 88 कोटींचे ड्रग्ज जप्त, कंपन्या संशयाच्या भोवऱ्यात
अमली पदार्थ नियंत्रण विभागाची कारवाई, चारजण गजाआड
महाड: रायगड जिल्ह्यातील महाड औद्योगिक वसाहतीतील रोहन केमिकल्स कंपनीतून 88 कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त करण्यात आले. ही कारवाई महाड एमआयडीसी पोलीस आणि अमली पदार्थ नियंत्रण विभागाच्या पथकाने संयुक्तरित्या केली. या प्रकरणी चौघांना पोलिसांनी गजाआड करत 34 किलो किटामाईन पावडर आणि 13 किलो लिक्विड किटामाईन असा 88 कोटी रुपयांचा साठा जप्त केला.
या कारवाईमुळे एमआयडीसीतील अनेक कंपन्या संशयाच्या भोवऱ्यात अडकल्या असून पोलिसांकडून नेमक्या ‘कनेक्शन’चा शोध घेतला जात आहे. मच्छिंद्र भोसले (रा. जिते-महाड), सुशांत पाटील (मोहप्रे-महाड), शुभम सुतार (पाचगाव-करवीर, कोल्हापूर), रोहन गवस (मालाड-मुंबई) अशी अटकेतील संशयितांची नावे आहेत.
महाड औद्योगिक पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस नाईक इक्बाल चाँद शेख यांनी पोलीस ठाण्यात खबर दिली. महाड एमआयडीसी पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, महाड एमआयडीसीतील ई, 26/3 या प्लान्टमध्ये रोहन केमिकल्स कंपनी कार्यान्वित आहे. या कंपनीच्या प्रांगणात सुरू असलेल्या बेकायदेशीर रसायन प्रक्रियेवर कारवाई केली.
या युनिटचा वापर कायदेशीर उत्पादनाऐवजी अमली पदार्थ निर्मितीसाठी केला जात असल्याची बाब प्राथमिक तपासातून उघड झाली आहे. या प्लान्टमधून 34 किलो किटामाईन पावडर आणि 13 किलो लिक्विड किटामाईनचा साठा हस्तगत केला. पथकात महाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने, महाड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष जाधव यांच्यासह अन्य पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश होता.
या प्रकरणात अनेक व्यक्तींसह एमआयडीसीतील लहान रासायनिक कंपन्यांचा समावेश असल्याचा महाड पोलिसांना संशय आहे. त्यादृष्टीने पोलिसांकडून तपास गतिमान करत अधिक माहिती घेतली जात आहे. या धडक कारवाईबद्दल कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजय दराडे यांनी पोलीस पथकाचे कौतुक केले. अमली पदार्थाची बेकायदेशीर साखळी तोडून अशा प्रकारचे कृत्य करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे महाड पोलिसांकडून सांगण्यात आले.