For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दानशूर बिल्डर, वाहनचालक, पंच,‘गोल्ड मॅन’च्या घरांवर छापे

12:38 PM Sep 10, 2025 IST | Tarun Bharat Portal
दानशूर बिल्डर  वाहनचालक  पंच ‘गोल्ड मॅन’च्या घरांवर छापे
Advertisement

हणजूण, आसगावांत परिसरात मोठी खळबळ : पहाटेपासून रात्रीपर्यंत ईडीकडून छापासत्र

Advertisement

म्हापसा : प्रवर्तन निदेशालयाच्या (ईडी) अधिकाऱ्यांनी हणजूण व आसगाव येथे चार ठिकाणी छापे टाकले. हणजूण येथे भूमिका देवळाजवळ राहणारा बांधकाम व्यावसायिक मयेकर, त्याचा वाहनचालक, हणजूण-कायसूवचा पंचायत सदस्य पार्सेकर, गोल्डन मॅन म्हणून ओळखला जाणारा सावंत या चौघांच्याही घरावर छापे टाकण्यात आले. काल मंगळवारी पहाटे 6.30 वा. ही कारवाई सुरू झाली होती. ईडीचे अधिकारी पहाटे सहाच्या सुमारास 20 ते 25 वाहने घेऊन या ठिकाणी छापा टाकण्याकरता आले असल्याची माहिती उपलब्ध झाली. ही कारवाई झालेले चौघेहीजण आसगाव व हणजूण येथील जमीन घोटाळा प्रकरणात सहभागी आहेत. राज्य सरकारने भू बळकाव घोटाळ्यानंतर स्थापन केलेल्या एसआयटीमध्ये त्यांच्या विरोधात आसगाव-कोमुनिदाद आणि हणजूण कोमुनिदादने तक्रारी केल्या आहेत.

या चारहीजणांनी हणजूण आसगाव येथील जमीन बळकाव घोटाळा केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. कारवाईवेळी कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सायंकाळी उशिरापर्यंत ईडीचे अधिकारी याठिकाणी या चौघांच्या घरात, कार्यालयात कागदपत्रांची तपासणी करीत होते अशी माहिती पोलिसांनी दिली. महत्त्वाची अनेक कागदपत्रे अधिकारी ईडीने जप्त केली आहेत. तसेच इतर गोष्टीबाबत शहानिशा सुरू असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. दरम्यान हा व्यावसायिक मोठ्या प्रमाणात मंदिरासाठी दान तसेच इतर खासगी संस्थांनाही देणग्या देत होता. त्याच्याकडे बेहिशोबी मालमत्ता आहे काय? या दृष्टीकोनातूनही ईडीच्या अधिकाऱ्यांनी कागदपत्रांची झडती घेतल्याचे सांगण्यात आले आहे. या ईडीच्या छाप्यामुळे राज्यभर एकच चर्चा सुरू होती. यात गुंतलेल्या अन्य काहीजणांचे धाबे दणाणले असल्याचे सांगण्यात आले.

Advertisement

Advertisement
Tags :

.