For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आयएसआयएससाठी अर्थसाहाय्य प्रकरणी बेंगळूरमध्ये छापे

02:44 AM Jul 22, 2026 IST | Tarun Bharat Portal
आयएसआयएससाठी अर्थसाहाय्य प्रकरणी बेंगळूरमध्ये छापे
Advertisement

► त. भा. प्रतिनिधी

Advertisement

बेंगळूर :

आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना आयएसआयएसमध्ये युवकांच्या कथित भरती प्रकरणातील बेकायदा पैसे हस्तांतरण तपासाचा भाग म्हणून अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मंगळवारी कर्नाटकातील 8 ठिकाणी शोधमोहीम राबवली. यावेळी अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत.

Advertisement

ईडीच्या अधिकाऱ्यांच्या एका पथकाने मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत (पीएमएलए) बेंगळूर आणि आसपासच्या आठ ठिकाणी छापे टाकले. राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) नोंदवलेल्या एफआयआर आणि दाखल केलेल्या आरोपपत्राच्या आधारे ईडीने ही कारवाई केली आहे, असे अधिकाऱ्यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगितले आहे.

आयएसआयएस भरती प्रकरणाशी एनआयएने दाखल केलेल्या एफआयआरअंतर्गत तपास सुरू आहे. एनआयएने पाच जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल केले आहे. बंदी घातलेल्या दहशतवादी संघटना आयएसआयएस/आयएसआयएल/दाएशशी संबंधित असलेले हे आरोपी, बेंगळूरमधील कट्टरतावादी मुस्लीम तरुणांना आपल्याकडे आकर्षित करून त्यांना आयएसआयएस संघटनेत सामील होण्यासाठी प्रवृत्त केल्याचा आरोप एनआयएने केला आहे.

प्रकरणाची पार्श्वभूमी

आरोपी ‘इकरा वेल्फेअर ट्रस्ट’ आणि ‘गाईडन्स फॉर मॅनकाईंड’ नामक संस्थांमार्फत ‘इकरा कॅम्प’ नावाने व्यक्तिमत्व विकास कार्यशाळा आयोजित करत होते. या कार्यशाळांच्या माध्यमातून बेंगळूरमधील तरुणांना कट्टरतावादी बनविण्यासाठी आणि त्यानंतर ‘कुरान सर्कल’ नावाच्या साप्ताहिक अभ्यास मंडळाद्वारे त्यांच्यात कट्टरतावादी विचारांची पेरणी केली जात होती.

देशातील सीएए आणि एनआरसी विरोधी आंदोलनांदरम्यान पसरलेल्या जातीय भावनांचा फायदा घेऊन, या गटाने मुस्लीम तरुणांना इतर समुदायांविरुद्ध भडकवण्याचा प्रयत्न केला. याव्यतिरिक्त सोशल मीडियाद्वारे आयएसआयएसच्या विचारसरणीचा प्रसार करत होते. कट्टरपंथी बनलेल्या तरुणांना तुर्कस्तानमार्गे बेकायदेशीरपणे सीरियाला पाठवून सीरिया सरकारविरुद्ध लढण्यासाठी त्यांना प्रेरित केले जात होते.

अवैध आर्थिक व्यवहारावर ईडीची नजर

आयएसआयएसच्या विचारसरणीचा प्रसार करण्याबरोबरच, तरुणांना विदेशात पाठवण्यासाठी मोठ्या प्रमाणात पैशांचे व्यवहार केले जात होते. आरोपी विविध व्यक्ती, ट्रस्ट आणि त्यांच्या स्वत:च्या बचतीतून पैसे गोळा करून ते आयएसच्या नेटवर्ककडे वळवत होते, अशी माहितीही तपासातून उघड झाली आहे. ईडीचे अधिकारी सध्या या अवैध पैशांचा स्रोत, डिजिटल पुरावे, बँक खात्याचा तपशील आणि विदेशातून या ट्रस्टमध्ये पैसे आले होते का, याचा शोध घेण्यासाठी तपास करत आहेत.

Advertisement
Tags :

.