रेडकर, बागकर, लुथरांच्या घरांवर छापासत्र
महत्त्वाची कागदपत्रे, रोकड, दागिने जप्त : हडफडे, मयडेसह दिल्लीत, गुरुग्रामध्येही छापे : अंमलबजावणी व आयकर विभागाची कारवाई
म्हापसा : हडफडे येथील ‘बर्च बाय रोमिओ लेन’ नाईट क्लबमधील अग्नितांडव प्रकरणातील मुख्य संशयित क्लबचे मालक गौरव व सौरभ लुथरा बंधु, सहमालक अजय गुप्ता, क्लबला बेकायदेशीर परवाने प्रकरणातील संशयित तसेच याच प्रकरणावरुन अपात्र ठरलेला हडफडेचा माजी सरपंच रोशन रेडकर, बडतर्फ झालेला सचिव रघुवीर बागकर यांच्यासह अनेक संशयितांवर अंमलबजावणी संचालनालय (ईडी) आणि आयकर विभागाने काल शुक्रवारी पहाटेपासून एकाचवेळी छापेमारी केली.
गोव्यासह दिल्लीत नऊ ठिकाणी ही कारवाई सुरू करण्यात आली. क्लबच्या अवैध कामकाजाची माहिती, कागदपत्रे, आर्थिक व्यवहाराची माहिती, रोकड, दागिने, तसेच मनी लाँडरिंगच्या शक्यतेचीही पडताळणी केली जात आहे. काल शुक्रवारी पहाटे सहा वाजल्यापासून हे छापे एकाचवेळी सुरु झाले. ही बातमी वाऱ्यासारखी सर्वत्र पसरल्यावर प्रसारमाध्यमांनी छाप्यांच्या ठिकाणी धाव घेतली. या छापासत्रामुळे याप्रकरणाशी संबंधित असलेल्या सर्व अधिकाऱ्यांचे तसेच हडफडे ग्रामपंचायतीच्या आजी-माजी पंच सदस्यांचे आणि कर्मचाऱ्यांचेही धाबे दणाणले आहेत.
रेडकर, बागकर कुटुंबांमध्ये घबराट
प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी रोशन रेडकर तसेच रघुवीर बागकर यांच्या निवासस्थानी धाव घेतली असता तेथे उपस्थित असलेल्या पोलिस अधिकाऱ्यांनी त्यांना मज्जाव केला. ही केवळ नियमित तपासणी आहे, असे पत्रकारांना सांगितले. अचानक पडलेल्या छाप्यांमुळे रोशन रेडकर व रघुवीर बागकर यांची कुटुंबे घाबरून गेली. कारवाई अधिकाऱ्यांनी दोघांच्याही घरांतील कागदपत्रांची पडताळणी केली. तसेच आवश्यक असलेल्या वस्तूंची घरामध्ये शोधाशोध केली. काही महत्त्वाची कागदपत्रे, रोकड, दागिने आदी ऐवज जप्त केल्याची माहिती हाती लागली आहे.
बागकरच्या दोन्ही घरांवर छापे
अटकेत असलेला बडतर्फ सचिव रघुवीर बागकर याच्या मयडेतील मूळ घरावर आणि पर्रा येथील त्याच्या आणखी दुसऱ्या घरावरही छापे टाकण्यात आले आहेत. हडफडे येथे गेल्या 6 डिसेंबर रोजी बर्च नाईट क्लबमध्ये लागलेल्या आगीत 25 लोकांना जीव गमावावे लागले होते. याप्रकरणी आतापर्यंत 11 जणांना अटक करण्यात आली असून ते कोठडीत आहेत. रोशन रेडकर गुरुवारी न्यायालयाला शरण आल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. त्याची पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली. त्यानंतर काल शुक्रवारी पहाटे ईडी व आयकर विभागाने मिळून ही संयुक्त छापेमारी सुरू केली आणि गोव्यात खळबळ माजली.
लुथरांच्या घर, कंपन्यांवर छापे
बर्चचे मालक असलेले गौरव आणि सौरभ लुथरा बंधुंच्या मालकीच्या दिल्लीतील निवासस्थानावर तसेच त्यांच्या दिल्लीतील कंपन्यांवर शुक्रवारी पहाटे एकाचवेळी छापे टाकण्यात आले. लुथरा बंधूंच्या दिल्लीतील किंग्सवे कॅम्प आणि गुऊग्राममधील निवासस्थानांवर, कार्यालयांवर छापे टाकले आहेत.
दिल्लीत खोसलाच्या घरावर छापा
सुरेंद्र कुमार खोसला याचे दिल्लीतील घर आणि कार्यालयावरही छापासत्र सुरु असून ईडीची पथके तेथे कसून तपास करत आहेत. बर्च नाईट क्लबने अनेक नियमांचे उल्लंघन केल्याचे तपासातून आढळून आले आहे. एकंदरीत मनी लाँड्रिंगच्या शक्यतेने कारवाई हाती घेण्यात आली आहे.
बर्च अग्नितांडवप्रकरणी 11 जण अटकेत
गोवा पोलिसांनी या प्रकरणासंदर्भात एकूण 11 जणांना अटक केली आहे, ज्यात लुथरा बंधु, भागीदार अजय गुप्ता, हडफडे-नागवेचे माजी, अपात्र सरपंच रोशन रेडकर आणि बडतर्फ करण्यात आलेला माजी पंचायत सचिव रघुवीर बागकर यांचा समावेश आहे. अटक केलेल्या 11 जणांपैकी तिघांना जामीन मंजूर करण्यात आला आहे, त्यात वाहनचालक, गेट व्यवस्थापक आणि बार व्यवस्थापक यांचा समावेश आहे. बाकीचे सर्वजण कोठडीत आहेत.
47 दिवसांत धक्कादायक माहिती उघड
6 डिसेंबर रोजी बर्च क्लबमध्ये अग्नितांडव घडल्यानंतर गेल्या 47 दिवसांत धक्कादायक बाबी उघड झाल्या आहे. ईडीच्या तपासाचा रोख प्रामुख्याने क्लबच्या मालकी हक्कातील संशयास्पद व्यवहार व क्लबच्या उभारणीसाठी झालेली पैशांची जुळवाजुळव याकडे वळवला आहे. आग दुर्घटनेनंतर झालेल्या प्राथमिक तपासात असे समोर आले होते की, क्लबच्या मालकांनी बनावट आरोग्य दाखले व परवाने मिळवून हा व्यवसाय सुरू ठेवला होता. ज्या खाजन जमिनीवर हा क्लब उभारला गेला होता, त्या जमिनीचे बेकायदा रूपांतर करण्यामागे कोट्यावधींचे व्यवहार झाल्याचा संशय आहे.