जम्मूच्या 4 जिल्ह्यात 56 ठिकाणी छापे
लष्कर-ए-तोयबा, जैशशी संबंधित संशयितांना अटक; शस्त्रs, रोख रक्कम, इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त
वृत्तसंस्था/श्रीनगर
जम्मू-काश्मीर पोलिसांनी दोन दिवसांत 56 दहशतवादी तळांवर छापे टाकत अनेक संशयित दहशतवादी आणि जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तोयबाच्या ग्राउंड कार्यकर्त्यांना अटक केली आहे. जम्मू विभागातील चार जिह्यांमध्ये टाकलेल्या छाप्यांमध्ये पोलिसांनी अनेक शस्त्रs, रोख रक्कम, इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि कागदपत्रे जप्त केली आहेत.
गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी मंगळवारी राजौरी जिह्यातील घरांसह 9 भागात अनेक ठिकाणी छापे टाकले. याशिवाय दोन दिवसांत पोलिसांनी पूंछमध्ये 12, उधमपूरमध्ये 25 आणि रियासीमध्ये 10 ठिकाणीही धाडी टाकल्याचे जम्मू झोनचे अतिरिक्त पोलीस महासंचालक (एडीजी) आनंद जैन यांनी सांगितले. जप्त केलेल्या वस्तू आणि माहितीच्या आधारे पुढील तपास केला जाईल. परिसरात शांतता राखण्यासाठी गरज भासल्यास अशा आणखी कारवाया केल्या जाऊ शकतात, असेही स्पष्ट करण्यात आले.
जम्मू विभागातील चारही जिह्यांमध्ये दहशतवादी कारवायांशी संबंधित वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये छापे टाकण्यात आले. 2013 आणि यावर्षीच्या दहशतवादाशी संबंधित प्रकरणांचा तपास करण्यासाठी राजौरी आणि पूंछमध्ये हे छापे टाकण्यात आले. या कारवाईत अटक केलेले लोक दहशतवाद्यांना संवेदनशील माहिती, शस्त्रs आणि निधीचा पुरवठा करत असल्याचे स्पष्ट झाले आहे.